नदीपात्रात सापडलेली स्फोटके नकली; पेणकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वासअलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर नदीपात्रात सापडलेली स्फोटके नकली निघाली आहेत. त्यामुळे पेणकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गुरुवारी सायंकाळी पेण पोलिसांना मुंबई-गोवा महामार्गावर भोगावती पुलाखाली बॉम्बसदृश वस्तू असल्याचा फोन आला होता. या घटनेची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी बॉम्बशोधक पथकांना पाचारण केले होते. अलिबाग आणि नवी मुंबईची बीडीडीएस पथके घटनास्थळी दाखल झाली होती. नवी मुंबईचे दहशतवादविरोधी पथकही रात्री उशिरा दाखल झाले होते. रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे हेदेखील या वेळी उपस्थित होते. आसपासचा परिसर खबरदारी म्हणून रिकामा करण्यात आला होता. महामार्गावरील एका बाजूची वाहतुक काही काळ रोखून धरली होती. यानंतर मध्यरात्री उशिरा नदीपात्रातून ही बॉम्बसदृश वस्तु बाहेर काढण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केल्यानंतर हा एक बनावट बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. बॉम्बसाठी वापरण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांडय़ाही खोटय़ा असून त्यात कुठलेही स्फोटक नसल्याचे समोर आले. त्यामुळे सर्वानीच सुटकेचा निढश्वास सोडला.

कोणी तरी खोडसाळपणा म्हणून हा नकली बॉम्ब नदीपात्रात पुलाखाली टाकला असल्याचे समोर आले आहे. हा खोडसाळपणा करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पुलाखाली नदीपात्रात सापडलेल्या बॉम्बसदृश वस्तूत कुठलीही स्फोटके आढळून आलेली नाही. सर्व खबदारी घेऊन आम्ही या बॉम्बसदृश वस्तूची विल्हेवाट लावली आहे. कोणी तरी खोडसाळ वृत्तीने हा प्रकार केला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी जागरूक राहून संशयास्पद वस्तू अथवा हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

Source link

Leave a Reply