Headlines

मुंबईत संतोष बांगर यांचं शक्तीप्रदर्शन; एकनाथ शिंदेही झाले सहभागी; म्हणाले “तूच जिल्हाप्रमुख आणि आपणच शिवसैनिक…” | Maharashtra CM Eknath Shinde Santosh Bangar Shivsena Uddhav Thackeray Sahyadri Guest House sgy 87



शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. संतोष बांगर आपल्या समर्थकांसह आज सकाळी मुंबईत दाखल झाले. यानंतर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाबाहेर समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारदेखील हजर होते. एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगरच जिल्हाप्रमुख असतील असं जाहीर करत थेट उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला आव्हान दिलं.

एकनाथ शिंदेंनी यावेळी शक्तीप्रदर्शनात सहभागी झालेल्यांना संबोधित करताना म्हटलं की, “एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही आमदार म्हणून विधानसभेत पाठवल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. संतोष बांगर नेहमी सुख आणि दुखात धावून जातात. गेल्या महिन्याभरातील घडामोडी, प्रवास आपण पाहिला आहे. पण हे सागंण्यास मला अभिमान वाटतो की, एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांची दखल फक्त राज्य, देश नाही तर जगभराने घेतली आहे”.

“आपण बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार आपण पुढे नेत आहोत. बाळासाहेबांचे विचार, भूमिका, आदेश याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“लोकांच्या मनातील, सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातील शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आपण स्थापन केलं आहे. आमच्या भूमिकेचं स्वागत महाराष्ट्रातील सर्वांनी केलं आहे. आषाढीला पंढरपूरला गेलो तेव्हा लोकांनी जे प्रेम दिलं, स्वागत केलं ते विसरु शकत नाही. मी गाडीच्या बाहेर येऊन सर्वांचं स्वागत स्वीकारलं. त्यांना एकनाथ शिंदे आपल्यातील एकच असल्याचं वाटत आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. मी एकटा नाही, तर तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री आहात असंही यावेळी ते म्हणाले.

“हे सरकार सर्वांना न्याय देण्यासाठी आहे. राज्याचं सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार आहे. मुख्यमंत्री नसून मी या राज्याचा सेवक आहे. आपण मिळून या संधीचं सोनं करुयात,” असं आवाहन यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलं.

“महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढील निवडणुकीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं असतं. हिंदुत्व, सावरकर असो किंवा दाऊदचा विषय असो…आपल्याला उघडपणे बोलता येत नव्हतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली होती. बाळासाहेबांनी अन्यायाला वाचाव फोडा सांगितलं होतं. त्यामुळे हा बंड नसून अन्यायाविरोधातील उठाव आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“४०-५० लोक एका भूमिकेत असून ही भूमिका साधी नाही. ही हिंदुत्वाची आणि राज्याला पुढे नेणारी भूमिका आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच संतोष बांगर यांना तूच जिल्हाप्रमुख म्हणून तू कायम आहेस असं जाहीर केलं. इतकी ताकद मागे असताना इतर दुसरं कोण तिथे काम करु शकतं? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

“गेल्या अडीच वर्षात शिवसैनिकांना भोगावं लागलं. त्यांचं खच्चीकरण झालं, तडीपारीच्या नोटीस देण्यात आल्या, खोट्या केसेस टाकल्या, अनेकांवर मोक्काही लावण्यात आला. तेव्हा माझ्याकडे मुख्यमंत्रीपद नव्हतं. पण आता एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्रीपद आहे. पुढच्या अडीच वर्षात एकाही शिवसैनिकाचा बाल बाका करण्याची हिंमत कोणाची होणार नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. पण कोणी शिवसैनिकाच्या वाटेला आलं तर आम्ही सोडतही नाही,” असा इशाराही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला.



Source link

Leave a Reply