मोदींसमोर गुजरात मुख्यमंत्र्यांकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप, मेधा पाटकर यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

[ad_1]

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर अर्बन नक्षल असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर आता स्वतः मेधा पाटकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “भूपेश पटेल यांचे आरोप अत्यंत हास्यास्पद आहेत. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मतं मिळू नयेत यासाठी हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. त्यासाठीच नर्मदा बचाव आंदोलनाची बदनामी सुरू आहे,” असं मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं. आरोप करणाऱ्यांना अर्बन नक्षल काय आहेत हेही माहिती नाही असं म्हणत त्यांनी पटेल यांना टोला लगावला. त्या गुरुवारी (१५ सप्टेंबर) धुळे जिल्ह्यातील शहादा येथे नर्मदा बचाव आंदोलनाच्या संवाद यात्रेत बोलत होत्या. यावेळी देशभरातून अनेक सजग नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी या संवाद यात्रेत सहभागी झाले होते.

मेधा पाटकर म्हणाल्या, “ज्यांना अर्बन नक्षल काय हे माहिती नाही तेच असं वक्तव्य करू शकतात. आम्ही शहरातून आदिवासींच्या लढ्यासाठी आदिवासी भागात आलो आहोत. नक्षल सशस्त्र लढ्याचा मार्ग निवडतात, मात्र आमचा लढा अहिंसावादी आहे. त्यामुळे जे कधीच नर्मदा खोऱ्यात आदिवासींची परिस्थिती समजून घेण्यासाठी आले नाही, त्यांनी अशी विधानं करणं हास्यास्पद आहे. केवळ आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत.”

हेही वाचा – “…तर मला सोमवारपर्यंत अटक करावी नाही तर सोमवारी पंतप्रधानांनी माझी माफी मागावी”; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान

“गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मतदान होऊ नये म्हणून माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरू आहे. मी आपची मुख्यमंत्री पदाची उमेदवार आहे असा अपप्रचार सुरू आहे. मात्र, यावर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे,” असं मेधा पाटकर यांनी सांगितलं.

मेधा पाटकर पुढे म्हणाल्या, “सुरुवातीला जेव्हा सरदार सरोवर प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा आदिवासींना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. कोणत्याही पुनर्वसनाशिवाय प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र, नर्मदा बचाव आंदोलनाने या अन्यायकारक प्रकल्पाविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरील संघर्ष केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली. तसेच आधी आदिवासींच्या पुनर्वसनाचे आदेश दिले. याशिवाय जागतिक बँकेने आदिवासींच्या लढ्याची दखल घेत या प्रकल्पाला दिलेला निधी रोखला. आंदोलनाच्या प्रयत्नातून आतापर्यंत ५० हजार कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. याशिवाय बाकी असलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी काम सुरू आहे. केवळ पुनर्वसन नाही तर आरोग्य, शिक्षण या विषयांवरदेखील नर्मदा बचाव आंदोलन काम करत आहे.”

“काही लोकांनी आदिवासींच्या या संघर्षावर अनेक आरोप केले आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांनी प्रत्यक्ष नर्मदा खोऱ्यात येऊन या भागाची पाहणी करावी आणि हे काम पाहावं. आदिवासींशी बोलून वस्तुस्थिती समजून घ्यावी,” असं आवाहन मेधा पाटकर यांनी केलं.

सत्ताधारी भाजपाच्या काही नेत्यांनी मेधा पाटकर यांना अर्बन नक्षल म्हटलं त्यांचा नुरजी वसावे आणि अन्य आदिवासी स्थानिक गाव प्रतिनिधींनी निषेध केला. तसेच आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या मेधा पाटकर नक्षलवादी कशा? असा सवाल आदिवासी नागरिकांनी केला.

हेही वाचा – लव्ह जिहाद आणि अंतरधर्मीय विवाहाबाबत खासदार अनिल बोंडेंचं मोठं विधान; म्हणाले, “संसदेत…”!

जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक, पर्यावरणीय कार्यासाठी आंतरराष्ट्रीय गोल्ड मन पुरस्कार विजेते प्रफुल्ल समंतरा म्हणाले, “जे जे सरकारच्या धोरणांना विरोध करतात त्यांना नक्षलवादी ठरवलं जात आहे. मात्र, आम्ही संविधानातील मूल्यांवर विश्वास असणारे लोक आहोत.”

“निसर्ग विज्ञानाची आई आहे, विज्ञान तंत्रज्ञानाची आई आहे आणि हेच तंत्रज्ञान आज त्याच्या आजीला म्हणजे निसर्गाला नष्ट करत आहे. सध्या तंत्रज्ञान भांडवलदारांच्या हातात आहे आणि ते हवा तसा तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तंत्रज्ञान कुणाच्या हातात यावरच तंत्रज्ञानाचं भविष्य अवलंबून आहे,” असं मत प्रफुल्ल यांनी व्यक्त केलं.

“जीवन शाळा मुलांमध्ये देशप्रेम आणि आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवत आहेत. आज शिक्षणाचं खासगीकरण सुरू आहे आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षक नाहीत. त्यामुळे देशभरात जीवन शाळेच्या शिक्षणाचा प्रयोग नेला पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रातून राष्ट्रीय जन आंदोलनाच्या समन्वयक आणि नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या विश्वस्त सुनिती सुलभा रघुनाथ यांनी मेधा पाटकर यांच्यावरील आरोपांबाबत सरकारला इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, “नर्मदा बचाव आंदोलन हे कायम सत्याग्रही अहिंसक मार्गाने वाटचाल करत आलं आहे. त्याला अर्बन नक्षल म्हणणे ही बदनामी आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय नर्मदा नवनिर्माण अभियानाची सुरू असलेली चौकशी ती पूर्णपणे खोडसाळ आणि खोट्या आधारावर आहे. या प्रकरणात आम्ही सत्य समोर आणू. सरकारने मेधा पाटकर यांच्यावर कारवाई केल्यास संपूर्ण देशभरातील जन आंदोलन याविरोधात उभे राहतील.” यावेळी शहादा येथील अनेक आदिवासींनी मागील ३७ वर्षातील संघर्षाच्या अनुभवांचं कथन केलं. तसेच नर्मदा बचाव आंदोलनाच्या मदतीने कशा पद्धतीने पुनर्वसन झाले याचीही माहिती दिली.

नर्मदा बचाव आंदोलनाने देशभरातील नागरिकांना संवाद यात्रेत सहभागी होऊन हे रचनात्मक संघर्षाचे काम समजावून घेण्याचं आवाहन केलं होतं. याला प्रतिसाद देत देशभरातून अनेक राज्यांमधील नागरिक या संवाद यात्रेत सहभागी झाले. हे सर्व नागरिक ४ दिवसीय अभ्यास दौऱ्यात सरदार सरोवर प्रकल्प बाधित भागाची पाहणी करून काम समजावून घेणार आहेत. यात पुनर्वसनाचे काम पाहणे, विस्थापित आदिवासींशी संवाद करणे, आदिवासी पाड्यावरील मुलांच्या शिक्षणासाठी नर्मदा बचाव आंदोलनाने सुरू केलेल्या जीवन शाळांची पाहणी केली जाणार आहे.

१५ सप्टेंबरला सुरू झालेल्या या संवाद यात्रेची सांगता १८ सप्टेंबरला बडवानी येथे होणार आहे. या ठिकाणी आयोजित सभेत देशभरातून विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना सहभागी होणार आहेत. यावेळी शिक्षण क्षेत्रातील रमेश पाटील, समाजवादी महिला सभेच्या वर्षा गुप्ते, दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते अमितांशू व देशभरातून १२ राज्यांमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहत नर्मदा बचाव आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *