Headlines

विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षेचे नियोजन करा – शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू

[ad_1]

अमरावती, दि. 28 : दहावी तसेच बारावी या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा असतात. गत दोन वर्षापासून कोविड संक्रमणामुळे शिक्षण व परीक्षा पध्दतीमध्ये बदल झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पध्दत आणि प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी यामध्ये फरक आहे. इंटरनेट अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी बरेचदा ऑनलाईन शिकवणीपासून वंचित राहतात. या बाबींचाही सर्वांगिण विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षा पध्दतीचे नियोजन व्हावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या समवेत शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी शासकीय विश्रामगृह येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या नियोजनाबाबत आज आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आभासी बैठकीमध्ये दहावी-बारावीच्या होवू घातलेल्या परीक्षा, वेळापत्रक, अभ्यासक्रम आदींबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागाचे संबंधित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. लिखाणाच्या सवयी अभावी विद्यार्थी परीक्षेत कमी पडू नये यासाठी या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाचा वाढीव वेळ मिळावा. सध्या परिवहन महामंडळाच्या संपामुळे ग्रामीण भागातील एसटी बसेस नियमित सुरु नाहीत. बरेच विद्यार्थी गावात शाळा नसल्यामुळे शिक्षणासाठी इतर गावात जातात. असे विद्यार्थी वाहतूकीच्या सोयी अभावी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी ‘शाळा तेथे केंद्र’ देण्यात यावे. अथवा अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करता येईल का, याबाबींचाही विचार करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिले.

परीक्षा प्रक्रिया राबवितांना सीबीएससी बोर्ड प्रमाणे परीक्षा घेता येतील का, याचेही नियोजन करण्यात यावे. तसेच ऑनलाईन अभ्यासक्रम किती टक्के पूर्ण करण्यात आला आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल त्वरीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत नियोजनपूर्वक कार्यपध्दती राबवा

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वयोगट 15 ते 18 मधील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यामध्ये या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या लसीकरणाला वेग येण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करावे. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, यासाठी मायक्रोप्लॅनिंग करण्यात यावे. या परीक्षांच्या तारखा पुढे करता आल्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळेल. यासाठी शिक्षण विभाग, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात समन्वयाने पुढील कार्यपध्दती निश्चित करण्यात यावी. तसेच याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

शासनातर्फे महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना तसेच बाल संगोपन निधी योजना राबविण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या महिला व त्यांची अपत्ये या योजनेत बसणार नाहीत त्यांना शैक्षणिक मदत करण्यात येईल. अनाथ आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकल महिलांना प्रामुख्याने या योजनेचा लाभ देण्यात येईल. विद्यार्थी दत्तक योजनेबाबतही श्री. कडू यांनी संबंधितांशी चर्चा केली.

महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त समाधान शिंगवे, उपसंचालक डॉ. शिवलींग पटवे, विभागातील पाचही जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यावेळी आभासी पध्दतीने बैठकीला उपस्थित होते.

000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *