लष्करी अधिकारी असल्याचे सांगून व्यापाऱ्यांची फसवणूक



राजापूर : लष्करी अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी तालुक्यामध्ये सक्रिय झाली असून नुकताच एका व्यावसायिकाला अशा प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. त्याबाबतची पोलिसांकडे तक्रारही दाखल झाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने आपण भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचे सांगून तालुक्यातील जैतापूर, नाटे परिसरांतील काही व्यावसायिकांकडे माल पुरवण्यासाठी फोनद्वारे मागणी नोंदवली. संबंधित व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्या व्यक्तीने बनावट ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रेही या व्यापाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. त्यानंतर नोंदवलेल्या मालाचे पैसे ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याच्या बॅंक खात्याचा तपशील घेतला. पण प्रत्यक्षात पैसे न भरता उलट त्या खात्यातील पैसे काढून घेत फसवणूक केली आहे.

संबंधित प्रकार बनावट असल्याचा संशय आल्याने जैतापुरातील एका व्यावसायिकाने मात्र मालाची मागणी घेतली नाही. मात्र नाटे येथील एका व्यापाऱ्याला गंडा घालण्यात हे भामटे यशस्वी झाले आहेत.

याबाबतची तक्रार संबंधित व्यापाऱ्याने पोलिसांकडे दाखल केली आहे. ऑनलाइन पैसे पाठवण्याच्या इराद्याने डेबिट कार्ड किंवा अन्य माहिती मागवून गंडा घालण्याची नवीन पद्धत भामटय़ांकडून आता अवलंबली जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. अशा प्रकारे कोणत्याही ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नका आणि आपल्या बाबतीत अशी कोणतीही घटना घडल्यास तात्काळ आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Source link

Leave a Reply