Headlines

मध्यान्न भोजनामुळे कामगारांना मिळेल दिलासा – पालकमंत्री बच्चू कडू

[ad_1]

अकोला,दि.२६(जिमाका)- शासनाच्या कामगार विभागाने इमारत बांधकाम व अन्य कामगारांसाठी मध्यान्न भोजन देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे कामगारांना अल्पदरात पौष्टिक अन्न देऊन दिलासा मिळेल,  असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे व्यक्त केला.

 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मध्यान्न भोजनाची योजना राबविली जात आहे. या योजनेद्वारे कामगारांना त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन दुपारचे जेवण देण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत केली जाते. या योजनेची सुरुवात आज जिल्ह्यात करण्यात आली. त्यासाठी  म्हाडा वसाहत बांधकाम साईट येथे  पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते कामगारांना मध्यान्न भोजनाचा लाभ देण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, सहाय्यक कामगार आयुक्त राजू दे गुल्हाणे यांची उपस्थिती होती.  यावेळी गुल्हाणे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की,  जिल्ह्यात ७२ बांधकाम साईट्स  तसेच जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्या या योजनेशी संलग्नित करण्यात आल्या असून त्याचा लाभ जिल्ह्यातील तीन हजार ९०६ कामगारांना मिळेल. ही नोंदणी प्रक्रिया सुरु असून येत्या कालावधीत अधिक कामगार या योजनेचा तसेच मंडळाच्या अन्य कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील.

आपल्या भाषणात पालकमंत्री म्हणाले की,  कामगारांनी श्रम करणे थांबवले तर सगळं जग थांबेल. कामगारांचे निर्मिती व श्रमाचे कौशल्याची जोड नसेल तर भांडवलदारांचे भांडवलही व्यर्थ ठरेल. कामगारांचे जीवनमान अधिक उंचावून समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेत भोजन देतांना संबंधितांना अन्नदानाची भावना ठेवावी. ही सेवा आहे हे ध्यानात ठेवावे. या योजनेद्वारे कामगारांना दिलासा मिळेल असा विश्वास पालकमंत्री कडू यांनी व्यक्त केला.

 त्यानंतर पालकमंत्र्यांनी व उपस्थित मान्यवरांनी स्वतः कामगारांना भोजन थाळी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जया भारती यांनी केले.

०००

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *