Headlines

मेळघाटात तीन महिन्यांत ५३ बालमृत्यू; अनेक योजना राबवूनही अपयश

[ad_1]

अमरावती : बाल आणि माता आरोग्यासंबंधी शासनाच्या पातळीवर सुमारे डझनभर योजना राबवण्यात येत असूनही मेळघाटात कोवळी पानगळ सुरूच असून एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत शून्य ते सहा वर्ष वयोगटातील ५३ बालकांचा मृत्यू झाला. शिवाय १९ अर्भक मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, धारणी आणि चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत १४५२ बालकांचा जन्म झाला. त्यापैकी शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ५३ बालके दगावली.

अंगणवाडी कार्यक्षेत्रातील सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे वजन व उंची मोजून तीव्र कुपोषित बालकांची निश्चिती करणे आणि अशा बालकांना ग्राम बालविकास केंद्रांमध्ये (व्हीसीडीसी) दाखल करणे, नियमित लसीकरण अशा उपाययोजना केल्या जातात. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थी बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना घरपोच आहार, अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा मातांना चौरस आहार, सॅम बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रांमध्ये लाभार्थ्यांना तीन वेळचा अतिरिक्त आहार, सॅम श्रेणीतील बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी औषधोपचार, अशा उपाययोजना केल्या जातात, अशी माहिती महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आली आहे.

पावसाळय़ाच्या दिवसांत मेळघाटातील कुपोषित बालके, गर्भवती तसेच स्तनदा मातांना बालरोग आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नजीकच्या जिल्ह्यांमधून १५ दिवसांच्या कालावधीसाठी तज्ज्ञांच्या नियुक्त्या करण्यात येतात, पण अनेक ठिकाणी हे तज्ज्ञ पोहचत नाहीत किंवा दोन-तीन दिवस हजेरी लावून निघून जातात, अशा तक्रारी आहेत. मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

आरोग्य विभागासमोर आव्हान..

मेळघाटात सर्वसाधारण श्रेणीत ३२ हजार ५७६, तीव्र कुपोषित (सॅम) ४०९, तर मध्यम कुपोषित (मॅम) श्रेणीत ३ हजार ३४७ बालके आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत बालमृत्यूचा आकडा १५ ने कमी असला, तरी तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढू न देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

मेळघाटात आजही तुलनेने उपजत मृत्यू व बालमृत्यू अधिक आहेत. बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेमुळे अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांची सेवा फार महत्त्वाची ठरली आहे, पण ती नियमित हवी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, समुदाय आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती आहे. या समितीने देखरेख ठेवायला हवी. सर्व विभागांमध्ये समन्वय हवा.

– अ‍ॅड. बंडय़ा साने, सदस्य, गाभा समिती.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *