Headlines

Me Vasantrao Review : गोष्ट संघर्षानं कणखर झालेल्या; चाळीशीनंतरच्या सुरेल किमयागाराची

[ad_1]

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : एखाद्या कलाकाराच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट पाहताना त्याचा जीवनप्रवास थोडक्यात आणि अगदी जवळून जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. आजवर असे अनेक चित्रपट साकारले गेले. पण, ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यानं फक्त कलाकाराचा प्रवासच नव्हे, तर समाजाच्या कटू मानसिकतेवरही कटाक्ष टाकला आहे. (Mi Vasantrao )

जसं अभिमन्यूनं आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूहाची रचना जाणून घेतली तसंच गाणं, तेव्हापासूनच कानी पडल्यामुळं संगीताची आणि वसंतरावांची ओळख किती जुनी, याचा सहज अंदाज लावता येतो. 

कौटुंबीक अडीअडचणींमुळं एकट्या आईनंच वसंतरावांचा सांभाळ केला आणि तेव्हापासूनचा संघर्ष त्यांना काही चुकला नाही. किंबहुना हा संघर्ष त्याहीआधीपासूनचा. पुढं परिस्थितीमुळं थेट (आताच्या पाकिस्तानातील) लाहोरला जाऊन पोहोचलेल्या वसंतरावांना तिथं खाँसाहेबांच्या रुपात गुरु लाभला. 

क्षणार्धाचाही विचार न करता त्यांनी गायनाच्या सरावाला सुरुवात केली तिथेच त्यांच्या गळ्यातील हरकतींना महत्त्वाची दिशा मिळाली. त्याहीआधी वसंतरावांना अशा काही दिग्गजांचं मार्गदर्शन लाभलं ज्यामुळं त्यांची कला समृद्ध झाली. 

शंकरराव सप्रे, मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या गायनामुळं त्यांचा भक्कम पाया तयार झाला होता. पण, पुढे मात्र कुटुंब आणि जबाबदारीच्या विळख्यात हा गायक असा अडकला की हळुहळू गायनापासून तो दुरावला जाऊ लागला. 

इथं खास मित्र आणि हितचिंतक पु.लं. देशपांडे यांची वसंतरावांसाठीची तळमळ पाहताना निस्वार्थ मैत्रीची जाणीव होते. 

अखेर चाळीशीनंतर वसंतरावांमधला गायक खऱ्या अर्थानं सर्व बंधनांचे पाश तोडून गायनाचीच साधना करण्यावर भर देतो. ‘मी कायम गात असतो, तुम्हाला ते कधीतरीच दिसतं….’, असं म्हणताना त्यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय हे लगेचच कळतं. 

राहुल देशपांडे यानं साकारलेले वसंतराव पाहताना आपल्या आजोबांच्या मनातील तगमग मांडण्याची त्याची समर्पकता काळजाचा ठाव घेऊन जाते. मूळ गायक असूनही अभिनयाचा त्याचा हा प्रयत्न दाद मिळवून जातो.

कलाकाराला संघर्ष चुकलेला नाही, पण हा संघर्ष सुरु असताना समाजातील काही घटकांनीही त्यांच्या कलेला ललकारणं हाच वसंतरावांच्या सांगितीक एल्गाराचा उद्रेक ठरतो. 

‘माझ्या घराण्याची सुरुवात माझ्यापासूनच होते’, असं सांगणाऱ्या वसंतरावांच्या स्वभावाचे अनेक पैलू चित्रपटातून पाहता येतात. कुटुंबवत्सल वसंतराव, मैत्री जपणारे वसंताव, हतबलतेनं ग्रासलेले वसंतराव आणि एकेवेळी समाजानं नाकारलेले वसंतराव पाहताना खरंच या कलाकाराला ओळखण्यात उशिर तर नाही झाला? असाच प्रश्न मनात घर करुन जातो. 

वाढत्या वयामुळं शरीर साथ देत नसलं तरीही सुरांनी वसंतरावांची साथ कधीच सोडली नव्हती हेच चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सांगून जाते. संगीतप्रेमींसाठी हा चित्रपट म्हणजे नव्यानं आपल्यात जीव ओतणारी सांगितीक मेजवानी. पुष्कराज चिरपुटकरनं साकारलेले पुलं त्यांच्या विनोदबुद्धीमुळं सतत आपल्या मनाचा ठाव घेतात. 

चित्रपटाचं पार्श्वसंगीत त्याला जिवंतपणा देतं. म्हणजे इथं अगदी तबलजींपासून तंबोऱ्यापर्यंत प्रत्येव वाद्यानंही आपल्या हक्काच्या माणसासाठी सर्वस्व अर्पून काम केल्याचं पाहायला मिळतं. 

काही ठिकाणी चित्रपटाचा वेग मंदावतो. त्यामुळं खिळवून ठेवलेल्या प्रेक्षकांवरील पकड काहीशी ढिली पडते. पण, ती पुन्हा घट्ट करण्यात वसंतराव यशस्वी ठरतात. 

पंडित वसंतराव देशपांडे हे व्यक्तिमत्त्वंच इतकं मोठं आहे की, त्यांच्या कारकिर्दीत डोकावायचं तर, पुलं प्रकाशात आणावेत की बेगम अख्तर; पुणं प्रकाशात आणावं की नागपूर असेच प्रश्न पडतात. 

चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन्ही भाग काहीसे लांबलेले वाटतात. पण, पूर्वार्धात मंदावलेला वेग उत्तरार्धात चांगली गती घेताना दिसतो. चित्रपटगृहातून बाहेर पडताना वसंतरावांचे सूरही आपल्यासोबतच बाहेर निघतात आणि हीच चित्रपटाची पोचपावती ठरते… आणि शेवटी म्हणावंसं वाटतं…. गाते रहो!

दिग्दर्शन- निपुण धर्माधिकारी 
मुख्य कलाकार- राहुल देशपांडे, पुष्कराज चिरपुटकर, अमेय वाघ, अनिता दाते आणि इतर… 

[email protected]

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *