वैभवशाली, निसर्गसंपन्न महाराष्ट्राचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक नकाशावर झळकवण्यास पर्यटन विभाग सज्ज – मंत्री आदित्य ठाकरे


मुंबई, दि. 25- महाराष्ट्रात सर्व प्रकारची पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. या वैभवशाली, निसर्गसंपन्न महाराष्ट्राचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक नकाशावर झळकवण्यास पर्यटन विभाग सज्ज असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पर्यटकांना सोयी सुविधांबरोबरच नाविण्यपूर्ण पर्यटनाचा अनुभव घेता यावा, यासाठी राज्याने विविध धोरणे आखली आहेत. पर्यटनवृद्धीसाठी शासनाबरोबरच विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचाही मोलाचा हातभार असतो, ही बाब विचारात घेऊन राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या औचित्याने त्यांनी विविध 39 श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची घोषणा केली.

श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, बीच शॅक, कॅरॅव्हॅन अशा विविध धोरणांच्या माध्यमातून राज्याने पर्यटन स्थळे अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांना राहण्यासाठी देखील होम स्टे, पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्टस् आदी पर्यायांतून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन पिढीच्या पर्यटकांचाही विचार करण्यात आला असून पर्यटक, बायकर्स, सायकलिस्ट यांच्यासह पर्यटन क्षेत्रात कार्यरत भागीदारांची मते जाणून घेऊन विविध धोरणे आखण्यात आली आहेत. कोविड मुळे पर्यटनात खंड पडला असला तरीही कोविडनंतरच्या काळासाठी विविध धोरणांच्या माध्यमातून शासन सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आता राज्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती जागतिक स्तरावर करून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

श्रीमती तटकरे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या प्राकृतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक ठेव्याचे आपण जतन करीत आहोत. राज्याच्या हा मौल्यवान ठेवा पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्यासाठी महत्त्वाची धोरणे आखली आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून वेळोवेळी मिळत आहे. राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने ‘ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी, थोर समाज सुधारक व क्रांतिकारक यांच्या ऐतिहासिक चळवळींचे, जन्मभूमीचे दर्शन येत्या काळात अधिक व्यापक माध्यमातून घडविण्याचा प्रयत्न पर्यटन विभाग करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी पर्यटकांची आवड-निवड लक्षात घेऊन पर्यटन धोरणांमध्ये लवचिकता असणे आवश्यक असून त्यानुसार राज्याने विविध धोरणे आखली असल्याचे सांगितले. राज्यात असलेली विविध संग्रहालये हा माहितीचा खजिना असून पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

पर्यटन संचालक श्री.बोरीकर यांनी पर्यटनाचे फायदे व देशाच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्राचे महत्त्व सर्वांना पटवून देणे तसेच राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने राष्ट्रीय पर्यटन दिनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. केंद्र सरकारमार्फत ‘आझादी का अमृत महोत्सव’ही साजरा केला जात आहे. यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना ‘ग्रामीण आणि समुदायावर आधारित पर्यटन’ ही असल्याने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नव्याने जाहीर झालेल्या कृषी,  कॅरॅव्हॅन आणि साहसी पर्यटन धोरणाअंतर्गत नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पर्यटन संचालनालय समाजमाध्यमांद्वारे पर्यटनस्थळांविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते यावेळी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणाअंतर्गत पहिली नोंदणी करण्यात आलेल्या ‘मोटोहोम’ संस्थेच्या सचिन पांचाळ यांचा, साहसी पर्यटन धोरणाअंतर्गत जमीन, हवा आणि पाणी अशा विविध क्षेत्रात नोंदणीद्वारे सहभागी झालेल्या वसंत लिमये, पुष्कराज आपटे, अनुपम अविनाश जाधव, चिन्मय दिवेकर, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर आय लव्ह महाराष्ट्र या नावाने सहा भागांचा कार्यक्रम केल्याबद्दल कर्ली टेल संस्थेच्या कामिया जानी वर्मा यांचा तसेच किल्ले पर्यटन वृद्धींगत करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी ‘बायकर्स क्लब’ ने 18 किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. यातील प्रतिनिधींचा देखील मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रिएट युवर ओन स्टोरी इन्फ्लुएन्सर कार्यक्रमाअंतर्गत सिद्धार्थ जोशी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या अंतर्गत एक लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले 100 इन्फ्लुएन्सर आगामी सहा महिने राज्यातील विविध पर्यटनस्थळी जाऊन पर्यटनस्थळांची माहिती सांगणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते यावेळी दोन कॅरॅव्हॅनला झेंडा दाखवून त्याचाही शुभारंभ करण्यात आला. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील ‘फ्रीडम मुव्हमेंट सर्किट’ मधील महत्त्वाची ठिकाणे आणि टूर ऑपरेटर्सची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

पर्यटन सहसंचालक डॉ.सावळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विविध श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या राज्य पर्यटन पुरस्कारांची यादी

टूर ऑपरेटर्स : बेस्ट टूर ऑपरेटर (नॅशनल), बेस्ट टूर ऑपरेटर (इंटरनॅशनल), बेस्ट ट्रॅव्हल एजंट (महाराष्ट्र), बेस्ट टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (महाराष्ट्र), बेस्ट ॲडव्हेंचर टूर ऑपरेटर्स (महाराष्ट्र).

आदरातिथ्य : बेस्ट हॉटेल, बेस्ट हेरिटेज हॉटेल, बेस्ट इको-फ्रेंडली हॉटेल, बेस्ट इको-फ्रेंडली फॉरेस्ट/टेन्टेड अकोमोडेशन, बेस्ट होस्टेड अकोमोडेशन.

फुड अँड बेव्हरेज : बेस्ट होम डायनिंग, बेस्ट रेस्टॉरंट स्टँडअलोन, बेस्ट रेस्टॉरंट हॉटेल.

विविध श्रेणी : बेस्ट टुरिस्ट गाईड ऑफ महाराष्ट्र, बेस्ट अम्युझमेंट/ थीम पार्क्स, बेस्ट माइस सेंटर, स्पेशलाईज्ड टुरिझम सर्व्हिसेस, टुरिझम एज्युकेशन अँड ट्रेनिंग, बेस्ट थीम/ निचे टुरिझम ॲवॉर्ड.

गव्हर्नमेंट डिपार्टमेंट : मोस्ट टुरिस्ट फ्रेंडली नॅशनल पार्क/ सँक्चुरी, मोस्ट टुरिस्ट फ्रेंडली पिलग्रीमेज सेंटर (ट्रस्ट/ गव्हर्नमेंट बॉडी), बेस्ट सिव्हिक मॅनेजमेंट सिटी (म्युनिसिपल कॉर्पोरेशन), बेस्ट सिव्हिक मॅनेजमेंट सिटी (म्युनिसिपल कॉन्सिल/ नगर पालिका), बेस्ट व्हिलेज (ग्राम पंचायत).

डिजीटल टुरिझम ॲवार्ड : बेस्ट इन्फ्लुएन्सर ऑन सोशल मीडिया (युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक अँड ट्विटर), बेस्ट ट्रॅव्हल रायटर/ ब्लॉगर, बेस्ट महाराष्ट्र ट्रॅव्हल फोटोग्राफर, बेस्ट टुरिझम प्रमोशन इन प्रिंट मीडिया (न्युजपेपर/ मॅगझिन/ पब्लिकेशन), बेस्ट टुरिझम प्रमोशन इन डिजीटल मीडिया (न्यूजपेपर/ मॅगझिन/ पब्लिकेशन/ वेब पोर्टल), बेस्ट टुरिझम प्रमोशन इन इलेक्ट्रॉनिक मीडिया.

विविध टुरिझम टुरिस्ट सेगमेंट : सोशल इम्पॅक्ट इन टुरिझम ॲवार्ड, स्वच्छ पर्यटन प्रोजेक्ट ॲवॉर्ड ऑर चेंज मेकर्स ॲवॉर्ड, मोस्ट इनोव्हेटीव्ह/ युनिक टुरिझम प्रोडक्ट, बेस्ट वेलनेस सेंटर, बेस्ट मेडिकल टुरिझम फॅसिलिटी, बेस्ट टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, बेस्ट म्युझियम ॲवार्ड, बेस्ट टुरिझम डेस्टिनेशन प्रमोशन थ्रू मुव्ही/ वेब सिरीज/ डॉक्युमेंटरी इ., बेस्ट मोन्युमेंट ॲक्सेसिबल टू टुरिस्ट.

एक फेब्रुवारी पासून या श्रेणींमध्ये अर्ज करता येणार असून विजेत्यांना महाराष्ट्र दिनी पारितोषिके दिली जातील. याबाबतची अधिक माहिती पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.

०००००

Source link

Leave a Reply