Headlines

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम : ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान पृथ्वी पाटील ठरली देशातील सर्वोत्तम कॅडेट

[ad_1]

नवी दिल्ली, दि. २८  : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त केला आहे. तर पृथ्वी पाटील एनसीसीच्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट  (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान आज महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले.

येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या लष्कर,नौदल आणि वायुदलातील प्रत्येकी एक मुलगा व मुलगी अशा बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा कॅडेट कॅप्टन निकिता खोत आणि महाराष्ट्र एनसीसी  संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी तर सिनियर अंडर ऑफिसर सिध्देश जाधव यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारले. देशातील एकूण 17  एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 20२० ते  नोव्हेंबर 20२१ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर दिल्ली एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राला तब्बल सात वर्षानंतर प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १७ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मागील वर्षी महाराष्ट्र हा प्रधानमंत्री बॅनरचा उपविजेता ठरला होता तर राज्याला जवळपास तब्बल सात वर्षाने हा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाल्याने या बहुमानाचे विशेष महत्व आहे.

 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वी पाटीलचा सन्मान

या कार्यक्रमात एनसीसीच्या वायुदलाच्या (सिनीयर विंग) बेस्ट कॅडेट्सचा बहुमान पटकाविणारी महाराष्ट्राची कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिचा पंतप्रधानांच्या हस्ते मानाचे पदक व केन प्रदान करून सन्मान करण्यात आला. एनसीसी वायुदलाच्या बेस्ट कॅडेटसाठी देशातील कॅडेट्समध्ये चुरस होती.लेखी परिक्षा, समुह चर्चा आणि एनसीसी महासंचालकांसमोर प्रत्यक्ष मुलाखत व शिबिरातील परेड या निकषांवर बेस्ट कॅडेट्ची निवड करण्यात आली.

प्रधानमंत्री गार्ड ऑफ ऑनरमध्येही महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी

या विशेष कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एनसीसीच्या विविध विंगच्यावतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात येतो या मानाच्या गार्ड ऑफ ऑनरमध्येही महाराष्ट्राचे कॅडेट्स चमकले. महाराष्ट्राच्या  सिनीयर अंडर ऑफिसर गितेश डिंगर याला एनसीसीच्या चारही विगंच्या परेड कमांडरचा बहुमान मिळाला. एनसीसीच्या छात्रा विंगच्या नेतृत्चाचा बहुमान सिनीयर अंडर ऑफिसर सोनाली पाटील तर एअर फोर्स विंगचे नेतृत्व सिनीयर अंडर ऑफिसर राघवेंद्र सिंह याने केले.  प्रधानमंत्री गार्ड ऑफ ऑनरसाठी  एनसीसीच्या चारही विंगसाठी  निवड  झालेल्या देशातील ५७ कॅडेट्सपैकी सर्वात जास्त ७ कॅडेट्स हे महाराष्ट्राचे होते.

महाराष्ट्राची उत्कृष्ट कामगिरी

लेफ्टनंट कर्नल अनिरुध्द सिंह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या एनसीसी संघाने यावर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिल्लीतील कँन्टॉनमेंट भागात आयोजित एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबीरात महाराष्ट्रातील ३४ मुले आणि २३  मुली असे एकूण ५७ कॅडेट्स सहभागी झाले .पुणे येथे 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 202१ या कालावधी दरम्यान या कॅडेट्सचा कसून सराव झाला व कोरोना चाचण्याअंती हे कॅडेट्स 1 जानेवारी  २०२२ रोजी  दिल्लीतील शिबिरात सहभागी झाले. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या पथ संचलनात सहभागी देशभरातील एनसीसीच्या १०० मुलींच्या तुकडीत महाराष्ट्राच्या ८ मुलींची निवड झाली. महाराष्ट्रातील १७ पैकी ९ मुलांची निवड राजपथवरील पथ संचलनासाठी झाली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *