Headlines

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन करा : पालकमंत्री छगन भुजबळ


नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा): वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरण महत्त्वाचे असल्याने लसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

आज येवला येथील शासकीय विश्रामगृहात निफाड व येवला तालुक्यांच्या आयोजित कोरोना सद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी येवला प्रांताधिकारी सोपान कासार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उमेश पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, प्रमोद हिले, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, डॉ. शरद कातकाडे, गटविकास अधिकारी अन्सार शेख, संदीप कराड, येवला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक जलद गतीने वाढत आहे. या लाटेतील आजाराची लक्षणे सौम्य असल्याने ज्यांनी लसीकरण केले आहे त्यांना याचा धोका कमी जाणवतो. त्यामुळे नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करून 100 टक्के लसीकरण होण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात यावे. शहरी भागातील लसीकरणावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

रस्ते दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. तसेच शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करू नये, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला कोरोनामुळे कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावलेल्या महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय योजनेंतंर्गत मनीषा शिरसाठ, चंद्रकला खैरनार, सविता कदम, सुनीता बंदरे यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये असे वर्षाला 12 हजार रुपये मिळणार असून अशा 27 महिलांना प्रकरण मंजुरीचे आदेश वाटप करण्यात आले. तसेच नवीन रेशन कार्डचेही यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Source link

Leave a Reply