क्रातिसिंह नाना पाटील पुरस्काराने सन्मानित होणारे एक सच्चा कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो

कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो

१९१७ च्या रशियन राज्यक्रांती मुळे जागततिक पातळीवर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा उगम झाला.क्रांतिकारक विचारांचे अग्रणी कॉम्रेड मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्या विचारांचा प्रसार सुरू केला.पुढे मार्क्सवादापासून प्रेरणा घेत कॉ.श्रीपाद अमृत डांगे ,कॉम्रेड घाटे ,कॉ.गंगाधर आधिकारी यासारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन १९२५ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली व या देशात साम्यवादी चळवळीचा पाया घातला.तिथपासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांनी अजोड कामगिरी केली.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कम्युनिस्ट पक्ष अग्रेसर राहिला.अनेक देशव्यापी आंदोलनात पक्षाने सक्रीय भागिदारी केली. सुरुवातीपासून शेतकरी, शेतमजूर श्रमिक जनतेला त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे.त्यांचे जनलढे उभारणे,राजकिय दृष्टी प्रगल्भ करणे यासाठी गेली शहाण्णव वर्षे पक्ष सातत्याने प्रयत्न करतो आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा भारतातील एक प्रमुख क्रांतिकारी विचार व तत्वज्ञान असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. अशा या राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ.भालचंद्र कांगो हे ६ ऑगस्ट २०२१रोजी विटा नगरीत येत आहेत. त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय राजकारणातील एक अभ्यासू व संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल असे डाव्या चळवळीतील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव असलेले कांगो गेली पन्नास वर्षे आपल्या खांद्यांवर लाल बावटा घेऊन कष्टकरी कामगार शेतकरी आदिवासीं,असंघटीतांच्या लढ्यात अग्रेसर राहिलेले आहेत .

पक्षविचार, पक्षहित व पक्षीयभूमिका जशी महत्त्वाची असते तशीच त्रयस्थपणे भारतीय समाजाची वास्तव मांडणी करणेसुद्धा महत्त्वाचे असते हे लक्षात घेऊन कांगो अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखन करीत असतात.म्हणूनच ते परखड पत्रकार म्हणून ही ओळखले जातात. चळवळीच्या मुशीतून व मार्क्‍सवादी विचारसरणीच्या तत्वज्ञानातून देशाच्या राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचलेले आणि दिल्ली स्थित असणारे कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो सतत राजकीयदृष्ट्या सक्रिय असतात आणि संवेदनशीलतेने पक्षीय काम हाताळताना दिसतात.ते अनेक वर्षे पक्षाच्या युगांतर या मुखपत्राचे संपादक असून कालोचित विषय व घटनाक्रमानुसार संपादकीय लिहून या महाराष्ट्रातील गोरगरीब, उपेक्षितांच्या कामगार, शेतकरी,श्रमिकांच्या मागण्यांना त्यांच्या लढ्यांना वाचा फोडली आहे.तसेच डाव्या पुरोगामी चळवळीला उर्जितावस्था प्राप्त करून दिलेली आहे.

त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिल चे नऊ वर्षे राज्य सेक्रेटरी म्हणून त्यांनी उत्तम काम केलेले आहे आणि लढाऊ राज्य सचिव म्हणून आपली प्रतिमा जनमानसात रुजवली आहे. तसा कांगो आणि माझा संबंध तीस वर्षांपूर्वीपासूनच आहे.मी विद्यार्थी चळवळीत असताना आॉल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेत काम करीत होतो.विद्यार्थी युवकांच्या प्रश्नावर मुंबई,नागपूर विधीमंडळावरील मोर्चा साठी जायचो तेव्हा तेथे हमखास मोर्चा ला मार्गदर्शन करण्यासाठी कॉम्रेड भालचंद्र कांगो यांची हजेरी असायची. क्रांतीअग्रणी कॉम्रेड जी डी बापू लाड यांनी १९९४ साली मला चार दिवसाच्या पक्ष शिक्षण अभ्यास शिबिरासाठी औरंगाबादला पाठवले होते.

कॉम्रेड व्ही.डी.देशपांडे सभाग्रहात झालेल्या त्या शिबीराचे संपूर्ण संयोजन कॉ.कांगो,कॉ.मनोहर टाकसाळ यांनी केले होते.कॉ.गोविंद पानसरे ,कॉ.भालचंद्र कांगो, कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे ,कॉ.शिवदास उटाणे अशा अभ्यासू काँम्रेडस सोबत चार दिवस राहिलो.तेव्हा मी त्यांना जवळून समजून घेतले. त्यांची भाषणे ऐकली तिथपासूनच खऱ्या अर्थाने मला कम्युनिस्ट पक्ष हा देशातील एक अत्यंत चांगला असा क्रांतिकारी विचार व तत्वज्ञानी पक्ष असल्याची जाणीव झाली.डॉ. कांगो यांनी विविध विद्यार्थी आंदोलने,मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, रक्तदान चळवळ,ग्रंथालय चळवळ,आयटक कामगार चळवळ अशा अनेक चळवळीत हिरीरीने भाग घेतला.अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.अशारितीने त्यांचे कामही अन अभ्यास ही प्रचंड आहे.अहो,कॉम्रेड कांगो चा विविधांगी असणारा प्रचंड अभ्यास समोरच्या माणसाला निश्चित भावल्याशिवाय रहात नाही हे मी अनुभवले आहे.

2003 साली एप्रिल महिन्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने धर्मवाद,प्रादेशिक प्रश्न, जागतिकीकरण विरोध,पक्ष वाड्मय प्रसार असे उद्देश समोर ठेवून देशात जगाओ भारत,बचाओ भारत, बदलो भारत हा नारा देऊन ‘भारत जनजागरण यात्रा ‘संघटित केली होती .यात्रेचे महाराष्ट्रातील नेतृत्व कॉम्रेड गोविंद पानसरे व कॉम्रेड भालचंद्र कांगो करत होते.२४ एप्रिल २००३ रोजी यात्रेने सांगली जिल्ह्यात प्रवेश केला. पेठ नाक्यापासून ते सांगली कुंडल विटा खानापूर आटपाडी सांगोला इथपर्यंत या भारत जनजागरण यात्रेत एम.एटी.वरुन मी कॉ.मारुती शिरतोडे,दिलीप सव्वाशे सहभागी झालो होतो. तेव्हा कामगार नेते कॉम्रेड ए.बी बर्धन यांची कुंडल मध्ये जी.डी.बापू च्या अध्यक्षतेखाली विराट जाहीर सभा झाली.त्यानंतर रात्री ही यात्रा विटा येथे पोहोचली.पानसरे व कांगो यांनी कॉ.राजाराम तारळेकर यांचे घरी मुक्काम केला होता.त्यावेळी मी स्वतः कॉ मारुती शिरतोडे,कॉम्रेड दिलीप सव्वाशे, कॉम्रेड सदाशिव पवार, कॉ. रावसाहेब शिंदे ,कॉ. प्रभाकर दुगम,कॉ.हंबीरराव धनवडे, कॉ.पी.डी.कदम,कॉ.भिमराव गुरव असे खानापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पानसरे,कांगो सोबत हजर होतो.

तेव्हा कांगो यांची यात्रेदरम्यान सांगली कुंडल विटा खानापूर आटपाडी येथे मी जी भाषणे ऐकली तेव्हा एक लक्षात आले की कांगोचे भाषण म्हणजे एका सभेत बोललेली विधाने दुसऱ्या सभेत ऐकायला मिळत नव्हती. इतका अभ्यासू आणि विद्वान असणारा हा कम्युनिस्ट नेता कॉ.गोविंद पानसरे सोबत खांद्याला खांदा लावून पक्षकार्यात पूर्णवेळ सक्रिय असल्याचे दिसले.काँगो यांचे पक्षा संबंधी असलेले विचार आणि तळागाळातल्या जनते संबंधी असलेले विचार,अन त्याच पद्धतीने त्यांचा होणारा व्यवहार हे सर्व पाहून माझी पक्षावरची निष्ठा अधिक घट्ट होत गेली. पक्ष दरवर्षी विद्यार्थी युवक आघाडी ची दहा दिवसाची अभ्यास शिबिरे कधी कर्जतला ,कधी मुंबईला तर कधी संगमनेरला घेतो.तेथे कॉ. भालचंद्र कांगो हे अत्यंत मार्मिकपणे देशाचे राजकारण विद्यार्थी युवकासमोर मांडत असताना मी अनेकदा पाहिले आहे.

दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा होत असतो हे आपणा सर्वांना ज्ञात आहे.८ मार्च २०१३ला सांगली जिल्ह्यात पलूसला आम्ही मोठा महिला मेळावा घेतला होता आणि त्याचे प्रमुख पाहुणे होते कॉम्रेड भालचंद्र कांगो .या मेळाव्यात कांगो म्हणाले होते की श्रमिक महिलांनी आपल्या संघटित सामर्थ्याच्या बळावर महिलांच्या कामाचा आठ तासाचा दिवस ही मागणी मान्य करून घेतल्यामुळे हा दिवस केवळ जागतिक महिला दिन म्हणून साजरा न होता तो ‘स्त्री कामगार महिला दिन’ म्हणून साजरा व्हायला पाहिजे.अशी वेगळी मांडणी केलेची दखल तत्कालीन वृत्तपत्रांनीही घेतली गेली होती. कांगो सारख्या ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यासोबत गेली अनेक वर्षे आम्ही विचाराने एकत्र बांधलेलो आहोत. अनेक कार्यक्रमातून एकत्र आलेलो आहोत. याचा मला मोठा सार्थ अभिमान आहे. मराठी हिंदी आणि इंग्रजी वर प्रचंड प्रभुत्व असलेला हा नेता तितक्याच ताकतीने सगळ्या आंदोलनात भागीदारी करून विविध विषयावर परखड मांडणी करत असतो.

समाज परिवर्तनाच्या चळवळीत आपला पूर्णवेळ देणाऱ्या या कम्युनिस्ट नेत्यास एक महान कम्युनिस्ट नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दोन वेळा खासदार राहिलेले ,आखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले ,स्वातंत्र्यलढ्यातील सातारा प्रतिसरकार चे प्रणेते क्रांतीसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या नावाचा ‘क्रांतीसिंह पाटील पुरस्कार ‘क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ विटा यांच्यातर्फे जाहीर झाला हा खरोखरच दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.तसेच हा पुरस्कार क्रांतीसिंह नाना पाटलांची लेक क्रांतीविरांगना हौसाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बेळगावचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते साप्ताहिक साम्यवादी चे संपादक कॉम्रेड प्रा.आनंद मेणसे यांच्या हस्ते दिला जाणार आहे इतके वैचारीक साधर्म्य संयोजकांनी साधले आहे त्याबद्दल संयोजक ॲड सुभाष पाटील व भाई सुभाष पवार यांना मनापासून धन्यवाद.पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती कॉम्रेड भालचंद्र कांगो यांना सांगली जिल्ह्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या वतीन व सर्वहारा जनतेच्या वतीनेे क्रांतीकारी लाल सलाम.

लेखन-काँ. मारूती शिरतोडे

कॉ.मारुती शिरतोडे,वाझर


जिल्हाध्यक्ष,प्रगतिशील लेखक संघ,जि.सांगली

Leave a Reply