Headlines

कोकणात सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस; दक्षिण कोकणाच्या तुलनेत यंदा उत्तर कोकणात सरासरी पावसाचे प्रमाण जास्त



हर्षद कशाळकर

अलिबाग- कोकणाचे वार्षिक पर्जन्यमान २७५७ मिमी आहे. त्यातुलनेत पावसाळय़ाच्या पहिल्या दोन महिन्यात १५७६ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा ५७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण कोकणाच्या तुलनेत यंदा उत्तर कोकणात पावसाची सरासरी अधिक आहे. कोकण विभागात सर्वाधिक पाऊस पालघर जिल्ह्यात पडला आहे. तर रत्नागिरीत कमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. तर पालघर, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात या तुलनेत कमी पाऊस पडत असतो. यंदा मात्र पावसाळय़ाच्या पहिल्या दोन महिन्यात कोकणातील उत्तरेकडील जिल्ह्यातही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई शहरचे सरासरी पर्जन्यमान २ हजार २०४ मिमी आहे. त्यातुलनेत १ हजार ३०३ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ५९.१२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मुंबई उपनगरचे सरासरी पर्जन्यमान २ हजार ४३८ मिमी आहे. त्यातुलनेत यंदा १ हजार ५३४ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ६२.९७ टक्के पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान २ हजार ५१७ मिमी आहे तर १ हजार ३९१ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत येथे ५५.४२ टक्के पाऊस पडला आहे.

पालघर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान २ हजार ३८४ मिमी आहे. तिथे १ हजार ५४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ६४.८७ टक्के पाऊस पडला आहे. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ३ हजार २८० मिमी आहे. त्या तुलनेत १ हजार ६६१ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ५०.६६ टक्के पाऊस पडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३३५८ मिमी पाऊस पडतो. त्यातुलनेत यंदा १६९८ मिमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत ५०.६१ मिमी आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ३१२० मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा १८९५ मिमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरी पावसाच्या ६०.७९ टक्के आहे.

जून महिन्यात कोकणात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला होता. मात्र जुलै महिन्यात पावसाने ही कसर भरून काढली. जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात कोकणात पावसाची संततधार कायम होती. उत्तरार्धात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी समाधानकारक पावसामुळे कोकणातील धरणांमधील पाणी साठय़ात समाधानकारक वाढ झाली आहे. शेतीलाही अनुकूल परिस्थिती असल्याने भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला. तर यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असणार आहे.

कोकणात सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली आहे. शेतीस अनुकूल वातावरण आहे. पुढील दोन महिन्यात पावसाने सातत्य राखले तर कोकणात यंदा पाणी प्रश्न जाणवणार नाही आणि शेती उत्पादनही चांगले येऊ शकेल.

– डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण आयुक्त.

Source link

Leave a Reply