खरीप पेरण्यांनी सरासरी गाठली ; पेरा ९४ टक्क्यांवर; ऑगस्ट मध्यापर्यंत भातलावणीपुणे : राज्यात खरीप पेरण्यांनी सरासरी गाठली आहे. पेरण्या उशिरा सुरू होऊनही जुलैअखेर चांगला पेरा झाला आहे. सरासरी ९४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. कडधान्य आणि तृणधान्यांचा पेरा काहीसा घटला आहे. राज्याच्या विविध भागात भात लावणीची कामे पंधरा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे भाताच्या क्षेत्रात काहीशी वाढ होईल, अन्य खरीप पेरण्यांच्या टक्केवारीत आता फारसा फरक होणार नाही.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मोसमी पावसाने हजेरी लावताच पेरणीसाठी लगबग सुरू झाली होती. त्यामुळे पेरण्या उशिराने सुरू होऊनही सरासरी गाठली आहे. खरिपातील तृणधान्यांची पेरणी ७२ टक्क्यांवर गेली आहे. त्यापैकी भाताची पेरणी सरासरी ७३ टक्के, खरीप ज्वारी ४६ टक्के, बाजरी ५७ टक्के, मका ९४ टक्के नाचणी (रागी) ५९ टक्के आणि राजगिरा, कोडू, कुटकी, वरई, राळा, बार्टी, सावा आदींची पेरणी ६६ टक्क्यांवर झाली आहे. पाऊस उशिरा आल्यामुळे कडधान्यांच्यापेरणीचा काळ निघून गेला होता. जूनअखेपर्यंतची कडधान्ये पेरणी करणे फायदेशीर राहते. तरीही तूर ८६ टक्के, मूग ६६ टक्के, उडीद ९१ टक्के आणि कुळीथ, चवळी, मटकी, राजमा आदी कडधान्यांची पेरणी ८१ टक्क्यांवर गेली आहे. एकूण कडधान्यांची पेरणी ८३ टक्क्यांवर गेली आहे. तेलबियांची सरासरी पेरणी १११ टक्क्यांवर गेली आहे. त्यात भुईमूग ७५ टक्के, तीळ ३७ टक्के, कारळ ३२ टक्के, सूर्यफूल १०० टक्के, सोयाबीन ११४ टक्के आणि इतर तेलबियांची पेरणी ४२ टक्क्यांवर झाली आहे.

कोकण विभागात सर्वात कमी पेरा

विभागनिहाय पेरणीच्या टक्केवारीत कोकण विभाग पिछाडीवरच आहे. कोकण विभागात सर्वात कमी ८१ टक्के पेरणी झाली आहे. नाशिक विभागात ९३ टक्के, पुणे विभागात ९७ टक्के, कोल्हापूर विभागात ९१ टक्के, औरंगाबाद विभागात ९६ टक्के, लातूर विभागात ९६ टक्के, अमरावती विभागात ९६ टक्के आणि नागपूर विभागात ८५ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस उशिराने आल्याचा परिणाम कोकणातील पेरण्यांवर स्पष्टपणे दिसून आला आहे. कोकण आणि विदर्भात भाताची लावणी पंधरा ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता आहे.

खरीप पेरणीची वैशिष्टय़े

यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याचा परिणाम म्हणून तृणधान्यांचा पेरा घटला आहे. कृषी विभागाने मोहीम राबवूनही नाचणी (रागी) पेरणी ५९ टक्क्यांच्या पुढे जाऊ शकली नाही. कडधान्यांचा पेरा कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडय़ात अतिवृष्टीचाही फटका बसला. सोयाबीनला चांगला दर असल्याचा परिणाम म्हणून पेरणीचा टक्का वाढला.

मोसमी पाऊस उशिरा सक्रिय होऊनही जुलैअखेर सरासरीइतकी पेरणी झाली आहे. पावसाअभावी तृणधान्य आणि कडधान्यांचा पेरा काहीसा कमी झाला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिल्यामुळे सोयाबीनचा पेरा वाढला आहे. भातलावणी ऑगस्ट मध्यापर्यंत सुरू राहील. – विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण)

Source link

Leave a Reply