Headlines

खाम नदी

[ad_1]

  • प्रकल्पात काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव
  • स्मार्ट सिटी ‍विकास महामंडळाच्या प्रकल्पांचे उद्घाटन

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : शहराचा शाश्वत विकास खाम नदीच्या पुनरूज्जीवन या कामातून दिसतो. शासनासोबत येत संस्थांनी स्तुत्य असे खाम नदीचे पुनरूज्जीवन केले आहे. राज्यातील इतर महानगर पालिकांच्या आयुक्तांसमोरही खाम नदीच्या या कामाचे सादरीकरण व्हावे. अशा कामांची राज्यात गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले.

महापालिका, स्मार्ट सिटी, इको सत्व, छावणी नगर परिषद, व्हेरॉक कं., यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत खाम नदी पुनरूज्जीवन प्रकल्पातील विविध विकासकामांचे लोकार्पण  श्री. ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत व चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय आदींची उपस्थिती होती.

मंत्री ठाकरे म्हणाले, खाम नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांचे अभिनंदन करतो. खाम नदीवर वॉकिंग ट्रॅकिंग, जल तलाव,  बाल उद्यान, ओपन जिम, व्हॉलीबॉल मैदान, कमल तलाव,  सूर्य कुंड, खाम नदी प्रकाश योजना 100 नूतनीकरण केलेल्या पथदिव्यांची स्थापना, योग लॉन, फुलपाखरू उद्यान, ऍम्पिथिएटर आदी प्रकारच्या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. निश्चितच शाश्वत विकासाला पूरक अशी ही बाब आहे. खाम नदीचे रूंदीकरण, खोलीकरण करून नदीला पुनरूज्जीवित केले, ही आनंदाची बाब आहे.

जपानमध्येही शहरातून जाणाऱ्या अशाच नदीच्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करत असताना, नागरिक भोजन करताना पाहिलेले आहे, अशी आठवण सांगताना औरंगाबादकरही खाम नदीतील या पात्राचा अशाप्रकारे सदुपयोग करतील, असा विश्वास  श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.

खाम नदीच्या पुनरूज्जीवन कामात काम करणाऱ्या प्रत्येकांचा प्रशस्तीपत्र देऊन मंत्री ठाकरे यांनी कार्यक्रमात सन्मान केला. सुरूवातीला नदी पात्रात श्री. ठाकरे यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले, त्यानंतर पात्रातील विविध विकासकामांचे त्यांच्याहस्ते लोकार्पण झाले. नदी पुनरूज्जीवन कामकाजावर आधारीत ध्वनीचित्रफितही यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पांडेय यांनी केले.

स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन

आमखास मैदान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र परिसरातील औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.,च्या मुख्यालय परिसरात मंत्री ठाकरे यांच्याहस्ते इलेक्ट्रीक वाहनांचे लोकार्पण झाले. तसेच इमारतीतील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये (आयसीसी) इ-गव्हर्नन्स सिस्टीम, स्मार्ट नागरिक मोबाईल ॲप, जीआयएस आणि नागरी सुविधा केंद्रांच्या प्रकल्पाचेही उद्घाटन मंत्री ठाकरे यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी पालकमंत्री देसाई, महसूल राज्यमंत्री सत्तार, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार दानवे, जयस्वाल व खैरे, घोडेले आदींची उपस्थिती होती. मनपा प्रशासक पांडेय यांनी  या प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत श्री. ठाकरे यांना सविस्तर माहिती सादर केली. मंत्री ठाकरे यांनी यावर समाधान व्यक्त करत नागरिकांना अधिक सुविधा देण्याबाबत आवश्यक त्या सूचनाही केल्या. याप्रसंगी स्मार्ट सिटीचे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण शिंदे, मानव संसाधन व्यवस्थापक विष्णू लोखंडे व इतर अधिकारी कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

                                        *****

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *