कास पठारावर ‘ई-बस’, ‘बायोटॉयलेट’ सुविधा सुरू



कराड : जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ‘ई-बस’ व ‘बायोटॉयलेट’ सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दूरचित्रप्रणालीद्वारे लोकार्पण झाले. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यटन संचालक मििलद बोरीकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, की स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेला कास पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन खाते प्रयत्नशील आहे. कास पठार नैसर्गिक रीत्या अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर आहे. राज्य शासनाच्या नवीन महाबळेश्वरच्या योजनेतून कास पठारच्या विकासाला प्राधान्य राहणार आहे. वॉक वे तसेच दर्शन गच्ची (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा करणे, सुरक्षा वाढविणे तसेच घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही होईल असे लोढा यांनी सांगितले.

या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानताना कास पठाराच्या संवर्धनासाठी तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्व जण मिळून प्रयत्न करू, असे आवाहनही मंत्री लोढा यांनी केले.

शिवेंद्रराजे म्हणाले, की कास पठारावर ई-बसची सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा शासनाचा निर्णय चांगला आहे. कास येथील पर्यटकांना अजून सुविधा, नव्या पर्यटन स्थळांच्या निर्मितीसाठी नेहमीच सहकार्य राहील. प्रास्ताविकात साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, की कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. येथील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या ई-बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाने उपलब्ध केल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून ई-बसेस वाढवण्यासह कास संवर्धनासाठी आणखी उपाययोजना होतील.

Source link

Leave a Reply