Headlines

कालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

[ad_1]

पुणे, दि. १५: कालव्यांमधून जास्त गळती होत असलेली ठिकाणे शोधून तेथील गळती थांबवण्याच्या उपाययोजना प्राधान्याने हाती घ्याव्यात तसेच काही ठिकाणी कालवा अस्तरीकरणाची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि गतीने करावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील विविध धरण प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समित्यांच्या बैठका श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडल्या त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

नीरा उजवा कालवा, नीरा डावा कालवा, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बरी आहे त्यामुळे यापूर्वीच्या नियोजनानुसारच रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तनांचे नियोजन करावे, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले. नीरा प्रणालीतून रब्बीचे एक आणि उन्हाळी दोन तर खडकवासला प्रकल्पातून रब्बीचे एक आणि उन्हाळी एका आवर्तनासोबत काटकसरीने पाणी बचत करुन दुसरे आवर्तन सोडण्यात यावे असे या बैठकीत ठरले.

कालवे दुरूस्तीची कामे गतीने करावीत यावर भर देऊन श्री. पवार म्हणाले की, अस्तरीकरणाची कामे केल्यामुळे कालव्यांची पाणीवहनक्षमता दुपटीने वाढल्याचे दिसून आले आहे. अस्तरीकरणाची कामे दर्जेदार झाली आहेत का हे पाहण्यासाठी आपण स्वत: येणार असून कामे खराब आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासह अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

खडकवासला प्रकल्प :

पुणे शहरासाठी राखीव पाणीसाठ्यापेक्षा अधिक पाणी महानगरपालिका घेते. ते काटकसरीने वापरुन खडकवासला प्रकल्पांतर्गत नवा मुठा उजवा कालव्यातून रब्बीसाठी एक आणि उन्हाळी दोन आवर्तने देणे शक्य आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

बैठकीस आमदार राहूल कुल, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, अशोक पवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच.व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय चोपडे आदी उपस्थित होते.

महापौर श्री. मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका राबवत असलेल्या 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना, पाणी मीटर, पाणी सोडण्यासाठी स्वयंचलित वॉल्व, जुन्या पाईपलाईन बदलून नव्या अधिक व्यासाच्या पाईपलाईन टाकणे, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी खडकवासला डाव्या कालव्यातून सोडणे आदींबाबत माहिती देऊन पाणीगळती, पाणीचोरी रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर या उपाययोजना गतीने पूर्ण कराव्यात आणि शहरातील पिण्याच्या आणि ग्रामीण सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

राज्यमंत्री श्री. भरणे यांनी पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे नियमानुसार पाणीवापर करावा. अधिकचे पाणी वापरल्यामुळे सिंचनासाठी पाणी कमी पडत असून कालव्याच्या अखेरपर्यंतच्या (टेल) भागात कमी दाबाने आणि कमी काळ पाणी राहते असे सांगितले.

नीरा उजवा तसेच डावा कालवा :

नीरा प्रणालीअंतर्गत प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा सुमारे सव्वादोन टीएमसी अधिक पाणी असून समाधानकारक स्थिती असल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तने सोडण्यास कोणतीही अडचण राहणार नाही असे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीस राज्यमंत्री श्री. भरणे, आमदार समाधान अवताडे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, नीरा- भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, सांगोला सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक साळुंखे-पाटील, पाणीवापर संस्था प्रतिनिधी सुरेश पालवे-पाटील आदी उपस्थित होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *