जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल | Case filed against NCP MLA Jitendra Awhad and his workers Thane closing Har Har Mahadev film showमाजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले आहेत. या चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. परिणामी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर हर महादेव या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री ११ वाजता ठाण्यात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. याच कारणामुळे आता ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या १४१, १४३, १४६, १४९, ३२३, ५०४, अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आव्हाड यांचा आक्षेप काय?

“शिवाजी महाराजांच्या मांडीवरती झोपून आहे अफजलखान आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय,” असं आव्हाड म्हणाले. त्याचप्रमाणे ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईचं दृष्य दाखवण्यात आलं असून त्यालाही आव्हाड यांनी विरोध केला आहे. “बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायला गेले आहेत. हे कुठे दिसलं? बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांशी लढाई केली. बाजीप्रभू सच्चा सेवक होता शिवाजी महाराजांचा,” अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे.

दरम्यान, आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सध्या १५ ते २० पोलीस कर्मचारी विवियाना मॉल परिसरात तैनात आहेत.Source link

Leave a Reply