भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावरून शिंदे-भाजपा सरकारवर टीका केली आहे. मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा असल्याचा आरोप त्यांनी केली आहे.
हेही वाचा – “तू इथं काय करतेस असं म्हणत त्यांनी हाताने जोरात…”, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेचे गंभीर आरोप
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
“मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा आहे. मात्र महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ. महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“सत्तेचा सदुपयोग करून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याऐवजी सत्तेला हुकूमशाहीचे अस्त्र मानून त्याचा दुरुपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांची सर्व बाजूने कोंडी करण्यासाठी केला जातो आहे”, असा आरोपही त्यांनी शिंदे सरकारवर केला.
“साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून सत्ताधारी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील जनतेचा अकार्यक्षम सरकारविरोधातील आक्रोश वाढला की स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि विरोधकांनी आवाज उठवला की त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यातील पोलीस यंत्रणा यांचा वापर करून दडपशाही सुरु आहे”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.