‘मराठी भाषा पंधरवडा’निमित्त परिचय केंद्राचे उपक्रम

नवी दिल्ली, दि. १३ : ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून मराठीच्या वैविद्यपूर्णपैलूंवर आधारित ट्विटर मोहीम, लघुपट प्रक्षेपण आणि मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्यानांचे पुन:प्रसारण करण्यात येणार आहे.

मराठी भाषा विभागाच्या सूचनेनुसार १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय  कार्यालयांमध्ये आयोजन करण्यात येते.यावर्षी कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्रही  विविध कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करणार आहे.

विशेष ट्विटर मोहीम आणि लघुपट प्रसारण  

शुक्रवार, १४ जानेवारीपासूनच परिचय केंद्राच्या मराठी ट्विटर हँडलवर मराठी खाद्य संस्कृती,सांस्कृतिक वारसा, साहित्य -नृत्य -वस्त्र-आभूषण आदि परंपरांच्या माहितीवर आधारित  विशेष ट्विटर मोहीम राबविण्यात येणार आहे. मराठीसह परिचय केंद्राच्या हिंदी व इंग्रजी ट्विटर हँडलवरही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच परिचय केंद्राच्या सर्वच समाज माध्यमांवर १६ जानेवारी रोजी ‘शांतता! मराठीच कोर्ट चालू आहे’ या लघुपटाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

मराठीची महती सांगणाऱ्या पाच व्याख्यानांचे पुन: प्रसारण

मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या औचित्याने परिचय केंद्राच्या हिरकमहोत्सवी व्याख्यानमालेतील मराठीची महती सांगणाऱ्या निवडक पाच व्याख्यानांचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.

‘आधुनिक महाराष्ट्रातील मराठी वाड्मयाची ओळख’ विषयावर १८ जानेवारी रोजी ख्यातनाम साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे व्याख्यान, २१ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्राची शाहिरी पंरपरा’ विषयावर प्रसिध्द शाहीर संभाजी भगत ,२४ जानेवारीला ‘वारी : परंपरा आणि स्वरूप’ विषयावर संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या व्याख्यानाचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.

२५ जानेवारीला खासदार तथा दै.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे ‘जगाच्या पाठीवरील मराठी’ विषयावर आणि २८ जानेवारीला  मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ.  गणेश चंदनशिवे यांच्या ‘महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन’ विषयावरील व्याख्यानाच्या पुन: प्रक्षेपणाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा समारोप होणार आहे.

समाज माध्यमांहून लघुपट प्रसारण व व्याख्यानांचे पुन: प्रसारण होणार

 मराठी  भाषा  संवर्धन पंधरवडानिमित्त एक लघुपट आणि पाच व्याख्यानांच्या पुन: प्रसारणाची वेळ दुपारी ४ वाजताची राहील. परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक, युटयूब चॅनेलहून प्रसारण होणार आहे. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 हे  व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच  कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  वर पाहता येणार आहे.

                                                            00000

 रितेश भुयार/वि.वृ.क्र.  /दि. 13.01.202२Source link

Leave a Reply