hold mumbai civic elections in a month uddhav thackeray direct challenge to bjp zws 70



शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेऊन, महिनाभरात निवडणुका घेण्याचे आव्हान देत भाजपसह शिंदे गटाला लक्ष्य केले. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जोरदार प्रत्युत्तर देत, मतदारच धडा शिकवतील, असे ठणकावले. दसरा मेळाव्यावरून संघर्ष सुरू असलेल्या या दोन्ही गटांमध्ये बुधवारी या मेळाव्याची रंगीत तालीम रंगल्याचे चित्र दिसले.

मुंबई : मुंबई महापालिका जिंकण्याची भाषा करणाऱ्या ‘कमळाबाई’ आणि मुंबईचा संबंध काय, असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भाजपला लक्ष्य केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंमत असेल तर महिनाभरात पालिका आणि राज्य विधानसभा निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात झाला. पक्षातील बंडानंतर प्रथमच मेळावा घेऊन शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच होईल, असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोडाफोडीचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. ही आपली पहिली निवडणूक आहे, असे मानून संपूर्ण ताकदीने लढा, असे आवाहन करीत ठाकरे यांनी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक असेल, असा इशारा दिला.

भाजपबरोबर २५ वर्षे युतीत सडली आणि कुजली, या वक्तव्याचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख अनेकदा ‘कमळाबाई ’ असा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा उल्लेख ‘मिंधे गट’ असा केला. ‘‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनसंघ नव्हता. संयुक्त महाराष्ट्र समितीतून एकजूट सोडून जनसंघ बाहेर पडला होता. ही यांची औलाद आहे. मुंबईसह महाराष्ट्रासाठीच्या लढय़ात माझे आजोबा अग्रणी होते. माझ्या कुटुंबियांवर वंशवादाची किंवा घराणेशाहीची टीका होते. पण, मला अभिमान आहे. प्रत्येक शिवसेना कार्यकर्ता हे माझे ठाकरे घराणेच आहे. तुम्ही अन्य पक्षांमधून एवढे नेते आणि कार्यकर्ते घेतले आहेत, की तुमचा वंश कोणता, याचा पत्ताही लागत नाही. अन्य पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि आपल्या पक्षात आल्यावर धुवून स्वच्छ करायचे. तुम्ही काय माणसे धुवायची लाँड्री सुरू केली आहे का, असा सवाल ठाकरे यांनी भाजपला केला.

‘आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले’, असा प्रचार भाजपने सुरू केला आहे. त्यावर टिप्पणी करताना ठाकरे म्हणाले, जनतेच्या जीवाची मला काळजी होती. त्यामुळे मंदिरे उघडा, अशी मागणी भाजप करीत होते, तेव्हा मी करोना रुग्णालये, उपचार केंद्रे आणि अन्य सुविधा सुरू करीत होतो. पंढरपूरच्या वारीला आमच्या काळातच परवानगी दिली होती. त्यामुळे करोना परिस्थिती नीट हाताळल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आणि अन्य देशांनी कौतुक केले. जे उत्तर प्रदेशात व अन्यत्र घडले, ते महाराष्ट्रात घडले नाही, असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला.

शिवसेनेच्या जोरावर भाजपला पदे

शिवसेनेच्या ताकदीवर आणि परिश्रमावर निवडणुकीत विजय मिळाल्यावर भाजप नेत्यांनी विनासायास पदे भोगली, असा आरोप ठाकरे यांनी केला. महापौर आमचा की उपमहापौर भाजपचा, स्थायी समिती अध्यक्ष आमचा की अन्य समित्या भाजपला, अशी अनेक पदे उपभोगली. भाजपबरोबर आमची २५ वर्षे युतीत सडली, कुजली. आम्ही नालायक माणसे जोपासली. तुमचे कर्तृत्व काय, असा सवाल ठाकरे यांनी केला. कुस्ती आम्हालाही येते. कोण कोणाला माती लावते, दे दाखवून देता येईल, असे ठाकरे यांनी ठणकावले. काही नगरसेवक शिवसेना सोडणार, अशी चर्चा सुरू आहे. ज्यांना जायचे त्यांनी जावे, मी आमदारांनाही थांबविले नाही. ढीगभर गद्दारांपेक्षा मूठभर इमानदार शिवसेना कार्यकर्ते मला पुरेसे आहेत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बाप पळविणारी औलाद

मुले पळवणारी टोळी कार्यरत असते, हे आतापर्यंत माहित होते. पण, आता बाप पळविणारी औलाद आली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच बाळासाहेबांची प्रतिमा आहे ना, असा सवाल करीत ठाकरे यांनी ‘नाही तर ती पण पळवून नेलेली असायची’, अशी टिप्पणी केली.

मुंबईवर गिधाडे फिरत आहेत

मुंबईचे लचके तोडण्यासाठी आज गिधाडे फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत आहे. ‘‘त्यावेळी आदिलशहा आणि अनेक जण आले. आता अमित शहाही नुकतेच येऊन गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. पण कितीही जण आले, तरी आपण घाबरण्याचे कारण नाही. आपण लढायचे,’’ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. हिंदू-मुस्लिम किंवा मराठी-अमराठी असे फोडाफोडीचे डावपेच आखले तरी ते येथे यशस्वी होणार नाहीत. शिवसेनेने आतापर्यंत आणि करोनाकाळातही हिंदूंबरोबरच मुस्लिम बांधवांसाठी आणि अमराठींसाठीही काम आणि मदतकार्य केले आहे. त्यामुळे मुस्लिम, गुजराती, उत्तर भारतीय आणि सर्वच समाजघटकातील बांधव शिवसेनेबरोबर आहेत, असे ठाकरे म्हणाले.

दसरा मेळाव्याबाबत आज सुनावणी

मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर निर्णय घेण्यात मुंबई महापालिकेकडून चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आलेल्या या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश महापालिकेला देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर आज, गुरुवारी सुनावणी होणार आहे.

* मिंधे सगळे तिकडे गेले, संजय राऊत म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. यासाठीच व्यासपीठावर संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली.

* वरळीत मत्स्यालय, धारावीत आर्थिक केंद्र झाले पाहिजे.

* ५०० चौ.फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द, वीजेवर चालणाऱ्या बस, व्हर्च्युअल क्लास रुम, आरोग्यसुविधा आदी प्रकल्प शिवसेनेने राबविले.

फॉक्सकॉनबाबत खोटारडेपणा

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत राज्य सरकार धादांत खोटे बोलले आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर केंद्र सरकारने आणखी काही सवलती दिल्या आहेत. त्या महाराष्ट्रात येण्यासाठी का दिल्या नाहीत, असा सवाल करत ठाकरे यांनी याबाबत आधीच ठरले होते, असा आरोप केला. हा प्रकल्प महाराष्ट्रात आला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा. पण, यांचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा सुरू आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

जाती-धर्मात फोडाफोडी करून मुंबई जिंकता येणार नाही. त्यासाठी मुंबईकरांची मने जिंकावी लागतील. अमित शहा यांनी शिवसेनेला जमीन दाखवा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र, त्यांना अस्मान दाखविल्याशिवाय आम्ही राहणार नाही. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख



Source link

Leave a Reply