गॅसचा टँकर पुलावरून नदीत कोसळला ; चालकाचा मृत्यूरत्नागिरी :  मुंबई – गोवा महामार्गावरील अंजनारी (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील पुलावरून भारत पेट्रोलियमचा  गॅसने भरलेला टँकर नदीत कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

टँकर नदीत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तरीही वायू गळती सुरू झाली. त्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक काही काळासाठी अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. भारत गॅसचे पथक गोव्याहून निघाले आहे. ते रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल होणार आहे. पथकाच्या तंत्रज्ञांनी वायूगळतीचा धोका नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर या पट्टय़ातील वाहतूक पूर्ववत सुरू होईल, असे पोलिसांनी सांगितले.

या अपघाताची माहिती अशी की,  घरगुती गॅस भरलेला हा टँकर गुरुवारी (एमएच १२- एल टी- ६४८८)  जयगडहून गोव्याच्या दिशेने चालला होता.  दुपारी अडीचच्या सुमारास अंजनारी येथील तीव्र उतारावरून जात असताना टँकरवरील ताबा सुटल्याने  नदीत कोसळला. त्यात चालक प्रमोद जाधव (रा. उस्मानाबाद) यांचा  बुडून मृत्यू झाला.

महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याने हातखंबा येथील वाहतूक शाखेचे पोलीस, लांजा पोलीस घटनास्थळी आहेत. तसेच फिनोलेक्स, जिंदाल कंपन्यांची सुरक्षा पथके, लांजा येथील अग्निशामक दलाचे पथक  दाखल झाले आहे.

दरम्यान उंचावरून नदीमध्ये पडल्याने टँकरचे तीन तुकडे होऊन तीन ठिकाणी पडले आहेत. टॅंक व इंजिनसह केबिन अलग झाले आहेत, तर काही भाग पुलावरच अडकला आहे. घटनास्थळी पोचलेले जगद्गुरू नरेन्द्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांनी वायू गळती चालू असतानाही, दुसऱ्या रुग्णवाहिकेचे चालक रणजित व अन्य दोन स्थानिक व्यक्तींच्या मदतीने धाडस करून चालकाला नदीतून बाहेर काढून लांजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Source link

Leave a Reply