चार दिवसांत पावसाला जोर ; कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सर्वाधिक जलधारांचा अंदाजपुणे : दहा दिवसांपासून अधिक काळ विश्रांती घेतलेला मोसमी पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संपूर्ण राज्यातच पुढील चार ते पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

जूनमध्ये दीर्घ विश्रांती दिलेल्या मोसमी पावसाने राज्यात जुलैमध्ये सरासरी भरून काढली. जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ामध्ये राज्याच्या बहुतांश भागांत संततधार पावसाची हजेरी होती. काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले. मात्र, जूनमध्ये खालावलेली धरणांतील पाणीसाठय़ाची पातळी जुलैच्या पावसाने वाढू शकली. कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात सध्या सरासरीच्या पुढे पावसाची नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र पावसाने सर्वच विभागांमध्ये दडी मारली आहे. बहुतांश भागात निरभ्र आकाशाची स्थिती असल्याने तापमानात वाढ नोंदिवली जात आहे.

पावसाच्या विश्रांतीमुळे मुंबई परिसरासह कोकणात उकाडय़ात वाढ झाली आहे. पश्चिम-मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढले आहे. मराठवाडय़ातील कमाल तापमानही ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. विदर्भात ब्रह्मपुरी, वाशिम, वर्धा, अकोला आदी जिल्ह्यांतील दिवसाचे कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले आहे. त्यांमुळे या भागातही उकाडा वाढला आहे. राज्यात पुढील दोन दिवसांच्या कालावधीत काही भागांत ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर त्यानंतर दोन ते तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोकणात अतिवृष्टी..

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, नागपूरसह विदर्भातील सर्व भागांत, तर मराठवाडय़ात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकणात काही भागांत ६, ७ ऑगस्टला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊसभान..

* पुणे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांत दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ५ किंवा ६ ऑगस्टपासून घाट विभागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

* परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आदी जिल्ह्यांत ५ ऑगस्टपासून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. औरंगाबाद, सांगली, सोलापूर, जालना, अमरावती, नगर या जिल्ह्यांतही काही भागांत पावसाची शक्यता आहे.

Source link

Leave a Reply