फडणवीसांचा फोटो असलेलं ‘आपले सरकार आले, हिंदू सणांचे विघ्न टळले’ बॅनर शेअर करत मिटकरींचा टोला; म्हणाले, “हिंदूंच्या लाखो…” | amol mitkari slams eknath shinde government scsg 91जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाच्या समर्थनाने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने यावर्षी गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध उठवल्याचं चित्र पहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निर्बंध उठवण्यात आल्यानंतर या विषयावरुन मोठ्याप्रमाणात सत्ताधाऱ्यांनी जाहिरातबाजी केल्याचं पहायला मिळालं. गणेशोत्सव संपला असला तरी आता नवरात्रीसंदर्भातील शिंदे सरकारच्या घोषणाकडे नजर लागून राहिलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीटवरुन याच जाहिरातबाजीवरुन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच शिंदे सरकारलाही लक्ष्य केलं आहे.

गणेशोत्सवासंदर्भात मागील दोन वर्षांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध शिंदे सरकारने उठवल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी, “आपले सरकार आले, हिंदू सणांचे विघ्न टळले” असे बॅनर्स आणि पोस्टर्स अनेक ठिकाणी झळकावले होते. अनेक मंडपांबाहेरील या बॅनर्सवर फडणवीस यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही फोटो दिसत होते. याच बॅनर्सपैकी एका बॅनरचा फोटो शेअर करत मिटकरींनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. मिटकरींनी राज्यामधील समस्यांचा पाढा वाचत हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे.

भाजपाने मुंबईमध्ये लावलेल्या बॅनरचा फोटो शेअर करत मिटकरींनी या बॅनरला, “शेतकरी संकटात, परतीच्या पावसाने पिके उध्वस्त, साधूना मारहाण, पशुधनावर लंपीचे आक्रमण,” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच मिटकरींनी पुढे, “सरकार नसताना हिंदूंवर विघ्न आणणारे हेच ते आपले सरकार जे आता धर्माच्या नावाने जनतेत संभ्रम निर्माण करते आहे,” असा टोलाही लगावला आहे. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगावऐवजी गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुनही मिटकरींनी शिंदे सरकावर टीका केली आहे. “हिंदूंच्या लाखो तरुणांचा रोजगार गुजरातमध्ये पळवणारे हेच ते आपले सरकार आहे,” असंही मिटकरींनी म्हटलं आहे.

शिंदे सरकारच्या अनेक मंत्र्यांनीही या विषयावरुन आधी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं होतं.Source link

Leave a Reply