Headlines

एक्सप्रेस फिडरमुळे सावलीवासियांना होणार नियमित पाणीपुरवठा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

[ad_1]

चंद्रपूर, दि. 28 जानेवारी : सन 2050 पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेता सावली येथे वाढीव पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. मात्र सदर वाढीव योजना सद्यस्थितीत असलेल्या विद्युत कनेक्शनवर चालविल्यास वारंवार खंडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन अखंडीत विद्युत पुरवठा सुरू राहण्यासाठी आठ किलोमीटरची एक्सप्रेस फिडर लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात सावलीवासियांना नियमित पाणी पुरवठा होईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

सावली येथे एक्सप्रेस फिडर लाईनचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी मनिषा वाजाळे, दिनेश चिटकूनवार, प्रशांत राईंचवार आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत सावली नगर पंचायत क्षेत्राची लोकसंख्या 10 हजार असून येथे जवळपास तीन हजार नळ कनेक्शन आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, सन 2050 पर्यंतची संभाव्य वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन कोणीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये, म्हणून वाढीव पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी अखंडीत विद्युत पुरवठासुध्दा आवश्यक आहे. जिल्हा खनीज विकास निधीमधून 1 कोटी 84 लक्ष रुपये खर्च करून एक्सप्रेस फिडर लाईन टाकण्यात येणार आहे. जेणेकरून सावलीवासिंयाना नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील बोथली येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री म्हणाले, 2 कोटी 63 लक्ष रुपये खर्च करून हा रस्ता बांधण्यात येणार आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेला शब्द पाळला आहे. विकासाच्या बाबतीत या परिसराला कोणतीही कमी होऊ देणार नाही. बोथली येथे सामाजिक सभागृहासाठी 30 ते 35 लक्ष उपलब्ध करून देऊ. बोथली येथे गोसेखुर्दचे पाणी आणून सिंचनाची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी हिरापुरच्या उपसा सिंचन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

जिबगाव येथे रस्त्याचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री म्हणाले, येथील रस्त्यासाठी 24 कोटी रुपये मंजूर केले आहे. काम मजबुत आणि चांगले करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आल्या असून गावक-यांनीसुध्दा कामावर लक्ष ठेवावे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या फर्निचरसाठी 80 लक्ष, सांस्कृतिक सभागृहासाठी 30 लक्ष रुपये, शाळेच्या दोन वर्गखोल्यांसाठी 30 लक्ष रुपये तर ग्रामपंचायत भवन इमारतीसाठी 25 लक्ष मंजूर करण्यात आले आहे. सिंचन, आरोग्य, रस्ते, रोजगार हे आपल्या प्राधान्याचे विषय आहेत. परिसरातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बोथली ते घोडेवाही ते सिंडोला रस्ता (2 कोटी 63 लक्ष रुपये), जिबगाव येथे हिरापूर – बोथली – सावली – उसेगाव – जिबगाव – हरंबा – साखरी – लोंढाली – कढोली – कापसी – व्याहाड बुज रस्ता (24 कोटी) आणि वाघोली (बुटी) येथे वाघोली ते सामदा (बु.) रस्त्याचे (3 कोटी 13 लक्ष रुपये) भुमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाला बोथलीच्या सरपंचा खलिता मराठे, उपसरपंच सविता शेंडे, जिबगावचे सरपंच पुरुषोत्तम चौधरी, उपसरपंच इंदिरा भोयर यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *