eknath shinde group mla abdul sattar on tet scam certificateशिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाला असून त्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर येत आहे. सत्ताधारी शिंदे गटातील एका आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा सुरू झालेली असताना खुद्द अब्दुल सत्तार यांनीच यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करतानाच जर आपल्या कुटुंबातील कुणी दोषी असेल, तर ते गुन्हेगार आहेत, असं देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

“माझी बदनामी करण्याचा प्रयत्न”

अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हा सगळा आपली बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. “मला व्हॉट्सअपवर अशा प्रकारचा मेसेज दिसल्यानंतर मी स्वत: त्याचं स्पष्टीकरण दिलं. कुणीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे माझी बदनामी करत आहे. त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार”, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

टीईटी घोटाळा : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे?

“कायद्यानुसार या प्रकरणात जर कोणतीही चूक असेल, तर मुख्यमंत्री चौकशीचे आदेश देतील. सचिव किंवा शैक्षणिक अधिकारी यांच्याशिवाय याबद्दल दुसरं कोण स्पष्टीकरण देणार?” असा प्रश्न सत्तार यांनी उपस्थित केला आहे. “माझ्या परिवाराची चूक असेल, या प्रकरणी मी काही फायदा घेतला असेल तर मी गुन्हेगार आहे. नाहीतर ज्यांनी यात माझ्या कुटुंबाचं नाव घेतलं, त्यांची चौकशी मी करायला सांगणार”, असं देखील सत्तार यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

“…तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे”

दरम्यान, आपल्या कुटुंबाकडून काही चुकीचं घडलं असेल, तर कारवाई झाली पाहिजे, असं सत्तार यावेळी म्हणाले. “माझ्या कुटुंबाच्या लोकांनी पात्र असल्याचा काही फायदा घेतला असेल, तर त्यांच्यावर जरूर कारवाई झाली पाहिजे. माझा मुलगा टीईटी परीक्षेला बसलाच नाही. मग त्याचं नाव यादीत कसं येईल? तरी काही लोक त्यात नाव घेत असतील, तर चौकशीत येऊ द्या सगळं समोर”, असं ते म्हणाले.Source link

Leave a Reply