Headlines

eknath shinde goup mla bachchu kadu on cabinet expansion ministerial post



महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं आहे. या दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंच्या गटातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये मंत्रिपदं कशी दिली जातील आणि भाजपाकडे कोणती मंत्रिपदं राहतील? यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंसोबत गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबत असलेल्या अपेक्षेवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली आहे.

एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, नेमकं कधी हे घडणार? याविषयी अद्याप निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार असून त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी त्यांना अपेक्षित असलेल्या मंत्रिपदाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. “माझा विषय अपंग बांधवांचा आहे. मी अपंगांसाठी महाराष्ट्रभर १००-१५० गुन्हे स्वत:वर दाखल करून घेतले. ३२ शासन निर्णय काढले. पूर्ण भारतात पहिल्यांदा ५ टक्के निधी फक्त महाराष्ट्रात खर्च होतो. आमच्या आंदोलनानंतर ९५चा कायदा सक्रीय झाला. शासन निर्णय आले आणि अपंगांच्या वाट्याला त्याचे काही फायदे आले. आमची इच्छा आहे की अपंगांसाठी वेगळं खातं तयार करण्यात यावं. त्याचं पद आम्हाला देण्यात आलं तर आम्हाला मोठं काम करता येईल”, असं बच्चू कडू म्हणाले.

“मी भाजपाला इशारा देतो, घोडेबाजारात…”, शिवसेना नेत्याचं टीकास्त्र!

“…तरी स्वत:ला धन्य समजू”

“जे अतिशय दुर्लक्षित घटक आहेत, ज्याचा भाऊ सुद्धा त्या अपंग बांधवाकडे पाहात नाही, त्यांची सेवा करण्याचं जरी काम आम्हाला दिलं, तरी आम्ही स्वत:ला धन्य समजू. ज्याच्यात जास्त बजेट आहे, ते खातं मोठं असं आम्ही समजत नाही. ज्याच्या सेवा करण्याची जास्त संधी आहे. जिथे अधिक वंचितांसोबत आम्हाला काम करता येईल, अनेकांचे अश्रू पुसता येतील असं पद जरी दिलं तरी चालेल. आमची काही मागणी, हट्ट नाही. ते पद दिलं, तर फार चांगलं होईल. अतिशय आनंदानं या सरकारची प्रतिमा अधिक कशी चांगली करता येईल, प्रत्येक अपंग बांधवाच्या घरापर्यंत कसं पोहोचता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू”, असं देखील कडू यांनी नमूद केलं.

अमरावतीचं पालकमंत्रीपद?

“कार्यकर्त्यांची मागणी होती की अमरावतीचं पालकमंत्री आम्हाला मिळायला हवं. तो प्रयत्न आम्ही करतोय. आम्ही विनंती करू. झालं तर ठीक आहे. नाहीतर जय राम कृष्ण हरी. त्यासाठी आमचा काही विषय नाही”, असं देखील बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.



Source link

Leave a Reply