ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी माझं बलिदान…” | Sanjay Raut first reaction after ED detained him in Patra Chawl scam case Mumbai pbs 91ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू केली. जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं. आता त्यांना ईडी कार्यालयात नेऊन पुढील चौकशी आणि प्रश्नोत्तरे होणार आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी फोनवर बोलत अशा कारवायांपुढे झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.”

“मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही”

“महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधकांवर राजकीय सुडाने कारवाया सुरू आहेत. त्याविरोधात माझ्यावरील कारवाईने बळ मिळेल. आमच्यासारखे काही लोक आहेत जे न झुकता, न घाबरता कारवायांना सामोरं जातात आणि लढाई लढतात, असा संदेश जाईल. अशा कारवायांच्या भीतीने अनेकजण पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करतात. मात्र, संजय राऊत त्यातील नाही. मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा : “५० खोकेवाले आता…”, राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

“…तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे”

संजय राऊत पुढे म्हणाले, “माझ्याकडे कोणतेही कागदपत्रे सापडली नाहीत. ते जी पत्राचाळ म्हणत आहेत तो पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे हेही मला माहिती नाही. ती चाळ कुठे आहे मला माहिती नाही. परंतु तरीही शिवसेना तोडायची, माझा आवाज बंद करायचा, उद्धव ठाकरेंना कमकुवत करायचं हे ठरलं आहे. त्यासाठीच ही कारवाई आहे. मात्र, अशा कारवाईने महाराष्ट्र, शिवसेना कमकुवत होणार नाही. उलट आजच्या माझ्यावरील कारवाईने शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळणार असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे.”Source link

Leave a Reply