Headlines

भूकंपाच्या सौम्य धक्क्याने लातूरमध्ये कटू आठवणींना उजाळा

[ad_1]

प्रदीप नणंदकर

लातूर :  निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात सप्टेंबर महिन्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसले यामुळे १९९३ मधील भूकंपाच्या कटू आठवणींना उजाळा मिळाला आहे. गेला महिनाभरापासून निलंगा तालुक्यातील हासोरी गावात जमिनीखालून आवाज येत होता.  जमीन हादरल्यासारखी स्थिती होते व हा आवाज म्हणजे भूकंपाचा धक्का आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यानंतर ग्रामस्थांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे तक्रार केली व प्रशासन आपले म्हणणे गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. आमदार अभिमन्यू पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे बोलणे करून दिले .फडणवीस यांनी प्रशासनाला या बाबी गांभीर्याने पाहा व लोकांच्या मनातील भीती दूर करा अशा सूचना केल्या. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र दिल्ली येथील दोन शास्त्रज्ञांचे पथक हासोरी परिसरात दाखल झाले व या पथकाने सर्व पाहणी केली. नोंदी घेतल्या.

 भूकंपाच्या सूक्ष्म नोंदी व्हाव्यात यासाठी निलंगा तालुक्यातील औराद व औसा तालुक्यातील आशिव या गावात भूकंपमापन यंत्र बसवले व त्या यंत्रावर सप्टेंबर महिन्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसल्याची नोंद झाल्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर अजयकुमार वर्मा यांनी सांगितले. १२ सप्टेंबर रोजी २.२ रिश्टर स्केलचा धक्का, १५ सप्टेंबर रोजी १.३ रिश्टर स्केलचा तर २३ सप्टेंबर रोजी २ रिश्टर स्केलचा धक्का बसल्याचे भूकंपमापक यंत्रात नोंद आहे. डॉक्टर अजयकुमार वर्मा यांनी लातूर हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या झोन -३ मध्ये येतो.

खबरदारी काय घ्याल?

तेरणा नदीच्या पात्रालगतच्या गावांमध्ये थोडा भूकंपाचा धोका जाणवतो, नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे. भूकंपरोधक घरे बांधली पाहिजेत. पत्र्याचे घर असेल तर पत्र्यावर लाकूड अथवा दगड वजन म्हणून ठेवू नये किंवा घरामध्ये खुंटीला शेतातील अवजारे अडकवून ठेवू नयेत. त्यामुळे हानी होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. हासोरी परिसरात सुमारे पाच किलोमीटर जमिनीखालून भूगर्भात हालचाली होत्या, ज्या भागात पाण्याचा अतिउपसा होतो त्या भागात असे जमिनीखालून आवाज होऊ शकतात, त्यातील ते एक कारण आहे.

जमिनीत खाली केवळ पाच किलोमीटर अंतरावर हालचाली असल्यामुळे आवाज होता, त्या खालच्या बाजूला पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर या हालचाली झाल्या असत्या तर त्याचा तेवढा धोका किंवा गांभीर्य लोकांना जाणवले नसते असे वर्मा म्हणाले. ३० सप्टेंबर १९९३ ते २०२२ या कालावधीत लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक ५३ भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद आहे. १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५, २००३ मध्ये ५, २००४ मध्ये ७ धक्के बसले. २०१२ ते २०२२ या काळात २१ धक्क्यांची नोंद भूकंपमापन यंत्रावरती आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यातच भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. १९९३ प्रमाणेच या वर्षी जास्त पाऊस होता त्यामुळे लोकांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भूकंपानंतर लातूर, उस्मानाबाद व सर्वच परिसरांत भूकंपरोधक घरे बांधली पाहिजेत यासाठी शासन आग्रही होते. लातूर व परिसरातील बांधकामांना परवानगी देताना बांधले जाणारे घर भूकंपरोधक आहे की नाही याची काळजी घेतली जात होती. ९३ चा भूकंप होऊन बराच कालावधी उलटून गेल्यामुळे ही काळजी घेण्याचे प्रशासन व जनता दोघेही विसरले. आता बांधकाम परवानगी न घेता करण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे ते भूकंपरोधक होत आहे की नाही हे पाहण्याची तसदी घेतली जात नाही.

 शासनाच्या वतीने गरिबांना म्हाडा व विविध योजना अंतर्गत घरे बांधून दिली जातात ,बांधून दिली जाणारी घरे तरी भूकंपरोधक आहेत का ? याबाबत निश्चित माहिती सांगण्यास प्रशासन धजावत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की ही बांधकामे भूकंपरोधक होत नाहीत. आपल्याकडे बैल गेला आणि झोपा केला अशी सवय आहे. एखादी आपत्ती घडून गेल्यानंतर त्याची कारणमीमांसा सांगितली जाते व त्यानंतर लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जाते. प्रशासनाने आता तरी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील परिसरात राहणाऱ्या लोकांची सुरक्षितता गांभीर्याने घेतली पाहिजे. बांधली जाणारी घरे ही भूकंपरोधक आहेत का जे कच्चे बांधकाम आहेत त्यात लोक राहत आहेत का? याबाबतीत सर्वेक्षण करून लोकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *