डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आणि वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे


मुंबई, दि. 03 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही विषयातील प्रवेश प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. एल एल बी, बी एड् यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या फेरी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे सीईटी विभागाने कळवले असून, त्याअनुषंगाने वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजना यातील लाभांपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून, पात्र विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन श्री. मुंडे यांनी केले.

००००

Source link

Leave a Reply