Headlines

उद्ध्वस्त Gadchiroli Somanpalli village destroyed due to Medigadda dam msr 87

[ad_1]

तेलंगणातील मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे. सोमनपल्ली गाव पुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. गावातील २०६ कुटुंबे महामार्गावरील जंगलात ताडपत्रीच्या साह्याने तंबू उभारून तेथे वास्तव्याला आहे. आता आम्ही गावात परत जाणार नाही, आम्हाला इतरत्र हलवा, आमचे पुनर्वसन करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. साप, विंचू, किड्यांचे वास्तव्य असलेल्या जंगलात १० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून हे ग्रामस्थ वास्तव्याला आहे.

धरणाच्या निर्मितीवेळी जी भीती व्यक्त केली होती, ती आता खरी ठरतेय –

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर सिरोंचा तालुका वसलेला आहे. अतिशय दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी या तालुक्याची ओळख. तालुक्याला १९८६ नंतर प्रथमच पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. तेलंगणाच्या महत्त्वाकांक्षी मेडीगड्डा धरणामुळे हा तालुका उद्ध्वस्त झाला. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सहकार्याने पूर्ण झाला, त्याची किंमत मात्र सीमेवरील ग्रामस्थांना मोजावी लागत आहे. सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला निर्मितीवेळीच प्रखर विरोध केला होता. मात्र, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने स्थानिकांचा विरोध झुगारून प्रकल्पाला मान्यता दिली. तो विक्रमी वेळेत पूर्णदेखील झाला. ग्रामस्थांनी धरणाच्या निर्मितीवेळी जी भीती व्यक्त केली होती, ती आता खरी ठरतेय.

पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून गावकरी अस्वस्थ –

यंदा आलेल्या पुरात सिरोंचा तालुक्यातील सीमेवरील ५४ गावे पाण्याखाली गेली. त्यातील सोमनपल्ली गाव तर पूर्णत: उद्ध्वस्त झाले. यामुळे नागरिकांनी थेट जंगलात आसरा घेतला आहे. पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून गावकरी अस्वस्थ आहेत. तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०६ कुटुंबे जंगलात वास्तव्यास असून ‘पुन्हा पूर आल्यास आम्हाला परत रत्यावर यावे लागेल. त्यामुळे आमचे इतरत्र पुनर्वसन करा, आम्ही गावात जाणार नाही’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या ठिकाणाला जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि तहसीलदार शिकतोडे यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ त्यांच्या मागणीवर ठाम आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून उपेक्षा –

मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला धावती भेट दिली. मात्र, पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सिरोंच्या तालुकावासीयांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपेक्षा केली. माजी मंत्री विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सोमनपल्ली ग्रामस्थांची भेट घेऊन मदत केली. मात्र, सरकार अद्याप या ठिकाणी पोहचू शकले नाही. फडणवीस सरकारने लोकांची मते न जाणून घेता मेडीगड्डा धरण पूर्ण केले. त्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप आता केला जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *