Headlines

“उपमुख्यमंत्र्यांना खातंच दिलेलं नाही, प्रत्येक फाईल…”, अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी | Ajit Pawars sarcastic remarks on Devendra Fadnavis on cabinet expansion pbs 91

[ad_1]

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळ विस्तार नाही. त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने होत नाही,” असं म्हणत शिंदे फडणवीस सरकारला चिमटा काढला. तसेच उपमुख्यमंत्र्यांना खातंच दिलेलं नाही, म्हणत खोचक टोलाही लगावला. ते मंगळवारी (२ ऑगस्ट) विदर्भ-मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्री यांना खातंच दिलेलं नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहेत. मात्र सहीअभावी फाईली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्री यांना अधिकारच दिलेला नाही.”

“मुख्यमंत्री सत्कार घेण्यात मश्गुल, हा असंवेदनशीलतेचा कळस”

“राज्यसरकारचे अधिकार गतीने व्हायला हवे व जनतेची कामे झाली पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे. कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्त्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस आहे,” असा आरोप अजित पवार यांनी केला.

“राज्याचा प्रमुखच नियम तोडत आहेत, तर पोलीस अधीक्षक काय करणार”

“मुख्यमंत्री मिरवणूका, सत्कार, सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. रात्री १० वाजल्यानंतर सभा घेत नाही तो एक नियम आहे. हा नियम सर्वांना मान्य हवा. राज्याचा प्रमुखच नियम तोडत आहेत, तर पोलीस अधीक्षक काय करणार. अक्षरशः घटना पायदळी तुडवत असतील, तर काय करणार?” असा उद्विग्न सवालही अजित पवारांनी केला.

“अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत त्याकडे लक्ष द्या”

“राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे एकंदरीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री इतर व्यापात आहेत मार्गदर्शन आणि दर्शन घेत आहेत. चर्चा करत आहेत. मात्र त्याआधी १३ कोटी जनतेचे तुम्ही प्रतिनिधित्व करता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत त्याकडे लक्ष द्या,” असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

विदर्भ मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

अजित पवार पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री यांच्याकडे याअगोदर अतिवृष्टी झालेल्या विदर्भ मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तिथे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना हेक्टरी ७५ हजार आणि फळबागांना हेक्टरी दीड लाख रुपये नुकसानभरपाई तात्काळ द्यावी. शिवाय अतिवृष्टीग्रस्त भागामधील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.”

“विकासकामांना स्थगिती दिल्याने जनतेमध्ये या सरकारबद्दल चीड”

“राज्यातील विकासकामांना स्थगिती दिल्याने जनतेमध्ये या सरकारबद्दल चीड निर्माण झाली आहे त्यामुळे विकासकामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी,” अशी मागणी अजित पवार यांनी केली.

“सर्वसामान्य गृहिणीला विचारले तर किती महागाई वाढली हे लक्षात येईल”

महागाईच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, “भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. याबाबत राज्यसरकार काय पाऊले उचलणार आहे हे सांगायला तयार नाही. निर्मला सीतारामण या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे वक्तव्य वाचले. मात्र, सर्वसामान्य गृहिणीला विचारले तर किती महागाई वाढली आहे हे लक्षात येईल. तेलाच्या किमती कमी आहेत हे मान्य करायला हवे परंतु इतर वस्तूंच्या किंमती कमी झालेल्या नाहीत.”

“२०१६ मध्ये नोटबंदी झाली त्यावेळी कॅशलेसचा आभास निर्माण केला गेला व काळा पैसा बाहेर येईल असे सांगण्यात आले परंतु तसे झाले नाही. अद्याप आरबीआयने किती नकली नोटा मिळाल्या हे सांगितलेले नाही. दोन हजारच्या नोटा डम करण्यात आल्या आहेत अशी चर्चा आहे. ते शोधण्याचे काम केंद्रीय यंत्रणांनी करावे,” असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले.

कुणी कितीही काही म्हटले तरी जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे असेही अजित पवार जेपी नड्डा यांच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले. अजित पवार यांनी राज्यात शेतकरी नैसर्गिक संकटात अडकलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रम

यावेळी अजित पवार यांनी विदर्भ, मराठवाड्यात शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे असे सांगितले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला परंतु त्यांनी केंद्रसरकारला अद्याप कळवले नाही असे दिसते त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करायला आलेली नाही असेही नमूद केले.

हेही वाचा : विदर्भ-मराठवाडा दौऱ्यानंतर अजित पवारांकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे ‘या’ २१ मागण्या

विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे १० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. त्यामुळे कृषी विभागाने व सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टी भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाही. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी तिथे ती मिळालेली नाही. मात्र काही ठिकाणी मनुष्यहानी झाली तिथे चार लाखाची मदत मिळाली आहे. परंतु ती मदत तुटपुंजी आहे. त्यात वाढ व्हायला हवी. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ मिळायला हवी. अतिवृष्टी भागातील घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभे करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे तिकडे लक्ष दिला पाहिजे, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *