Headlines

दसऱ्याला झेंडूची फुले महागण्याची शक्यता ; मुसळधार पावसामुळे नुकसान, प्रतवारीवर परिणाम



प्रकाश खाडे, लोकसत्ता

जेजुरी : यंदा झेंडूची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली असली तरी पावसाच्या संततधारेमुळे त्याचे नुकसान झाल्याने पुरवठय़ावर परिणाम होऊन दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे भाव वधारण्याची शक्यता आहे.

खंडेनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी पूजा, तोरणांसाठी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे त्यांच्या मागणीत मोठी वाढ होते. हे गृहीत धरून शेतकऱ्यांनी यंदाही मोठय़ा प्रमाणात लागवड केली होती. मात्र, सततचा पाऊस आणि काही भागांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने फुलांचे नुकसान झाले आहे. शिवाय, त्यांच्या प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. काही ठरावीक भागांत फुलांची वाढ चांगली झाली असली तरी मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण होऊन दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे दर चढेच असतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरीचा झेंडू बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र, नुकसानीमुळे याही बाजारात झेंडूची आवक कमी होण्याची शक्यता आहे. जेजुरीच्या झेंडू बाजारात पुणे, मुंबई तसेच राज्याच्या विविध भागांतून व्यापारी येतात. फुलांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना रोख पैसे मिळत असल्याने दसरा-दिवाळीच्या सणात त्यांना आर्थिक आधार मिळतो. त्यामुळे हक्काचे पीक म्हणून शेतकरी झेंडूची लागवड आवर्जून करतात. परंतु यंदा पावसाने फुलांच्या शेतीचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांच्या डोळय़ांत पाणी आले आहे.

पुरंदर तालुक्यातील हवामान झेंडूच्या उत्पादनास चांगले असल्यामुळे याही वर्षी तालुक्याच्या विविध भागांत झेंडूची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र, गेला दीड महिना सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे झेंडूची फुले खराब झाली. शेतात पाणी साचल्याने रोपांची मुळे सडली. ऊन नसल्याने झाडांची निरोगी वाढ झाली नाही. काही भागांत झेंडूची रोपे जळाली. आता माळरानावरील झेंडूचे फड शिल्लक आहेत.

किलोचा भाव १००च्या आसपास?

पावसाच्या तडाख्यामुळे झेंडूच्या फुलांचे पीक घटले आहे. त्यामुळे जेजुरीच्या पारंपरिक बाजारामध्ये झेंडू मोठा भाव खाण्याची शक्यता आहे. ठोक बाजारात एक किलोचा भाव किमान १०० रुपयांच्या आसपास राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

झेंडूची मोठी बाजारपेठ असलेल्या पुरंदर तालुक्यात यंदा मोठय़ा क्षेत्रावर लागवड झाली आहे. लागवडीसाठी आमच्याकडील सर्व रोपे विकली गेली. सुरुवातीला चांगला पाऊस होता, त्यामुळे रोपांची वाढ जोमदार झाली. मात्र नंतर पावसाचे प्रमाण वाढल्याने फुलांचे नुकसान झाले. – देवानंद जगताप, झेंडू रोपांचे उत्पादक

Source link

Leave a Reply