दानवे लोकसभा लढविण्यावर ठाम!लक्ष्मण राऊत, लोकसत्ता

जालना : जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीत भेटीगाठी झाल्या. यापूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात अनेकदा एकमेकांविरुद्ध जाहीर आक्रमक भूमिका घेणाऱ्या या दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश घेतला; परंतु या प्रवेशाची घोषणा करतानाच जालना येथे पत्रकारांशी बोलताना खोतकर यांनी आपण जालना लोकसभेच्या उमेदवारीची मागणी शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचेही सांगून टाकले.

खासदार दानवे यांच्याकडून खोतकर यांच्या मागणीला उत्तरही तेवढय़ाच तातडीने आले. राजकीय सारिपाटात भाजप आणि शिंदे गट जरी एकत्र आलेला असला तरी लोकसभेची जागा भाजपचीच असल्याचे दानवे यांनी सांगितले. यापूर्वी रेल्वेच्या एका कार्यक्रमातही दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघाचे पुढील खासदार आपणच असणार असल्याचे सांगितले होते. शिवसेना-भाजप युतीमध्ये ही जागा नेहमीच भाजपकडे राहात आली असल्याकडेही भाजपकडून यानिमित्ताने पुन्हा एकदा लक्ष वेधण्यात येत आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर खोतकर आणि दानवे यांच्यातील राजकीय वाद वाढला होता; परंतु देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने त्या वादावर काही काळ पडदा पडला होता. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हे दोघेही १९९० मध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले. १९९९ मध्येही दोघे विधानसभेवर पुन्हा निवडून आले. १९९९ पासून मात्र दानवे लोकसभेवर निवडून येत गेले आणि खोतकर विधानसभा निवडणुकींना सामोरे जात राहिले.  जिल्ह्याच्या राजकारणात आपापल्या पक्षांत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या अनेक निवडणुका लढवून त्या ताब्यात घेतल्या. नव्या राजकीय समीकरणात खोतकर यांनी लोकसभेची जागा लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी भाजपला म्हणजेच दानवे यांना ही जागा सोडायची नाही. त्यामुळेच दानवे यांनी आपले आणि खोतकर यांचे निवडणुकीचे क्षेत्र वेगवेगळे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

१९९६ पासून झालेल्या जालना लोकसभेच्या सातही निवडणुका भाजपने सलगरीत्या काँग्रेसचा पराभव करून जिंकलेल्या आहेत. त्यापैकी दोन वेळेस उत्तमसिंह पवार, तर नंतर सलग पाच वेळेस दानवे भाजपकडून निवडून आलेले आहेत. जालना, भोकरदन, बदनापूर हे जालना जिल्ह्यातील तीन आणि पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री हे औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.

काँग्रेसकडून कुणीही उमेदवार असला तरी गेले सलग पाच वेळेस दानवे निवडून आलेले आहेत. तसे पाहिले तर १९८९ पासून झालेल्या नऊ निवडणुकांत (१९९१ मधील अंकुशराव टोपे यांचा अपवाद वगळता) आठ वेळेस या मतदारसंघात भाजपचा विजय झालेला आहे. गेल्या सात निवडणुकांत काँग्रेसने पाच उमेदवार बदलून पाहिले; परंतु त्यांचा भाजपसमोर निभाव मात्र लागला नाही.  २०१४ ची निवडणूक मात्र दानवेंना बऱ्यापैकी जड गेली होती. त्या वेळी दानवे आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या मतांमध्ये जेमतेम साडेआठ हजार मतांचे अंतर होते. शिवसेनेतील नाराज मित्रांची समजूत काढण्यापासून ते काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक साधण्यापर्यंतचे कौशल्य असणारे दानवे निवडणुकीच्या राजकारणात वाकबगार आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघ सलग पाच वेळेस जिंकणाऱ्या दानवेंना परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस पक्षाची फारशी भीती वाटत नाही. गेल्या नऊपैकी आठ निवडणुका काँग्रेस पक्ष हरलेला आहे.

Source link

Leave a Reply