Headlines

कोरोनावर मात करीत जिल्ह्याची प्रगतीकडे वाटचाल – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे


बुलडाणा,(जिमाका) दि. 26 :कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाला आपण सामोरे जात आहे. या विषाणूचा संसर्ग थोपविण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनासोबत घेत विविध उपाययोजना राबविल्या. परिणामी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात शासनाला यश येत आहे. कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करीत जिल्ह्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतीपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.

भारतीय प्रजासत्ताकाचा 72 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, जि.प अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विभागप्रमुख, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

कोरोनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, जिल्ह्यात 18 वर्ष वयोगट पुढील लाभार्थ्यांना 16 लक्ष 80 हजार 836 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 10 लक्ष 42 हजार 591 लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच 15 ते 18 वर्ष वयाच्या किशोरवयीन 57 हजार 48 लाभार्थ्यांनी आजपावेतो लसीचा पहिला डोस घेतला आहे. मागील काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत राज्य शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्ताचा तुटवडा भविष्यात निर्माण न होण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.

जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, अशा हवालदील परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. खरीप हंगाम सन 2021 मध्ये माहे जुन ते ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे 2.17 लक्ष हेक्टर क्षेत्र बाधित झाले. निकषानुसार 96 हजार 457 शेतकऱ्यांच्या 74.87 कोटी रूपयांची नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. खरीप हंगाम सन 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये 1 लक्ष 25 हजार 21 शेतकऱ्यांना 99.91 कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यात 1 लक्ष 69 हजार 596 लाभार्थी शेतकऱ्यांना 1139 कोटी रूपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरले आहे.

ते पुढे म्हणाले,गरीब व आर्थिक दुर्बल घटकाला नाममात्र पाच रूपये दरात दर्जेदार जेवण देण्यासाठी शिव भोजन थाळी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत 23 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून 2021 वर्षात 9 लक्ष 36 हजार थाळी सवलतीच्या दरात वितरीत करण्यात आली आहे. तसेच दरमहा अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना 1 लक्ष 20 हजार 400 क्विंटल धान्याचे नियमित वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये आतापर्यंत 53 हजार 327 व्यक्तींना रोहयोच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत 831 कामे सुरू असून त्यावर 4 हजार 275 मजूरांची उपस्थिती आहे.

जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची कामे करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, पुढील 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 257 कोटी वित्तीय मर्यादेपेक्षा 57 कोटी रूपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला 315 कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. नियोजन समितीच्या माध्यमातून गाव तेथे वाचनालय, रस्ते निर्मिती व आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सोयी सुविधांची कामे करण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून आजपर्यंत 18 हजार 117 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात जिगांवसोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे. जिगांव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील 22 गावांपैकी 6 गावांचे पुनर्वसन पुर्ण करण्यात आले आहे. तसेच 10 गावांचे पुनर्वसन प्रगतीपथावर आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 आता गुटखा विक्री किंवा साठवणुकीच्या गुन्ह्यात लावता येणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षात 25 जप्ती कारवायांमध्ये एकूण 49 लक्ष 37 हजार 200 रूपये किमतीच्या प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येकाला दरडोई 55 लिटर पाणी मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात जल जिवन मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 622 योजना जल जिवन मिशन अंतर्गत असून 158 योजना प्रगती पथावर आहे. कोविडवरील लस आली असली तरी बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क, वारंवार हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे ही त्रि सुत्री अंगीकारणे गरजेचे आहे. भविष्यात कोविड सारख्या साथरोगांना यशस्वीपणे रोखण्यासाठी ही त्रि सुत्री प्रत्येकाने अंगीकारावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांना राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी परेड रिपोर्टींग केले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. साहेबराव सोळंकी यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रजासत्ताक दिनीपालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते पारितोषिकांचे वितरण

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कार, पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सशस्त्र सेना ध्वजदिन 2020-21 चे उत्कृष्ट निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना स्मृतिचन्ह देण्यात आले.

जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडून पोलीस प्रशिक्षण केंद्रात उल्लेखनिय सेवा दिल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट पोलीस पदक 2020 सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुरेश नाथाजी इंगळे यांना प्रदान करण्यात आले.

जिल्हा क्रीडा व युवा पुस्कार 2020-21 अंतर्गत स्वामी सुधाकर दळवी यास पुरूष गटातील जिल्हा क्रीडा पुरस्कार, कु. मोनाली चंद्रहर्ष जाधव हिस महिला गटातील जिल्हा क्रीडा पुरस्कार, मिहीर नितीन अपार यास जिल्हा क्रीडा विशेष पुरस्कार व विजय भाऊराव पळसकर, मलकापूर यांना जिल्हा क्रीडा विशेष गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा सामान्य रूग्णालय, चोपडे हॉस्पीटल बुलडाणा, अमृत हृदयालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल बुलडाणा, संचेती हृदयालय व सामान्य रूग्णालय खामगांव यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

Source link

Leave a Reply