Headlines

congress nana patole slams cm eknath shinde government u u lalit



महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

प्रभादेवी प्रकरणावरून नाना पटोलेंची टीका

प्रभादेवीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या प्रकारावरून नाना पटोलेंनी टीका केली आहे. प्रभादेवीत एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये विसर्जनाच्या दिवशी राडा झाला होता. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटलं होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा दोन्ही गटांमध्ये वाद झाले असून यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे.

या घटनेचा संदर्भत देत नाना पटोलेंनी टीका केली आहे. “महाराष्ट्रात तमाशा करण्याचं काम सुरू आहे. गुवाहाटी आणि त्यानंतरच्या प्रकारामुळे महाराष्ट्राची राजकीय बदनामी देशात झाली. दिवसाढवळ्या गोळीबार, मुलींचे अपहऱण या गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत. अजूनही पालकमंत्र्यांची नियुक्ती नाही. राज्यात निर्माण झालेला हा गोंधळ लोकशाहीला घातक आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा; मिरवणुकीतील वादाचं रुपांतर हाणामारीत, सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप!

सरन्यायाधीश मुख्यमंत्र्यांसोबत एकाच व्यासपीठावर!

दरम्यान, देशाचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत हे राज्य सरकारच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत एकत्र व्यासपीठावर उपस्थित असल्यामुळे त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सरन्यायाधीशांनी या प्रकरणातील एका पक्षासोबत कार्यक्रमात हजेरी लावणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त होत आहे. नाना पटोलेंनी त्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.

“राज्यकर्त्यांनी संविधानाच्या आधारावरच काम करावं असं अपेक्षित आहे. पण आज महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे. अशावेळी सरन्यायाधीश मुख्यमंत्र्यांना कसं भेटतात? सरकारवरच आक्षेप आहे आणि त्यांच्या कोर्टात न्याय चालू आहे.त्यामुळे लोकशाहीत जनतेनं कुणाकडे बघावं? असा प्रश्न पडला आहे. संविधान व्यवस्था, न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे”, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.



Source link

Leave a Reply