Headlines

Commonwealth Games: भारताला मेडल मिळवून देण्यासाठी रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम एकत्र खेळणार

[ad_1]

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ बर्मिंगहॅमला रवाना झाला आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताकडून 215 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे. यामध्ये 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडूंचा समावेश आहे. तर 107 कर्मचारी टीम इंडियासोबत आहेत. 28 जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत.

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मेडल मिळवून देण्यासाठी रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅमही सज्ज झाले आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण हो हे खरं आहे. विशेष म्हणजे हे दोघं भारतासाठी फुटबॉल नाही तर चक्क सायकलिंग करणार आहेत. आता तुम्ही म्हणाल फुटबॉल सोडून हे दोघं सायकल का चालवतील आणि तेही आपला संघ सोडून.

पण तुम्ही समजताय ते हे रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम नाहीएत. भारतीय पथकातील दोन सायकलपटूंची ही नावं आहेत. भारतीय सायकलिंग संघातील या दोन खेळाडूंची नावं आहेत रोनाल्डो सिंह आणि डेव्हिड बेकहॅम.

कॉमनवेल्थमध्ये सायकलिंग प्रकारात भारताची आतापर्यंतची कामगिरी फारशी विशेष झालेली नाही. 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतातून नऊ सायकलपटूंनी भाग घेतला होता. पण यापैकी कोणालाही मेडल जिंकता आलं नाही.  यावेळी मात्र सायकलिंग संघाकडून खूप अपेक्षा असतील. विशेषतः रोनाल्डो आणि बेकहॅमकडून.

भारताचे स्टार सायकलपटू
रोनाल्डो सिंह आणि डेव्हिड बेकहॅम हे दोन खेळाडू सध्याचे भारताचे स्टार सायकलपटू आहेत. दोघांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक मेडल जिंकली आहेत. रोनाल्डो आणि बेकहॅम यांना केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते किटही देण्यात आली.

भारताचा डेव्हिड बेकहॅम
तसं पाहिलं तर डेव्हिड बेकहॅम हे नाव फुटबॉलमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. तो इंग्लंडचा माजी कर्णधार राहिला असून त्याच्या खेळाचं सर्वांनाच वेड आहे. पण सध्या आपण ज्या डेव्हिड बेकहॅमबद्दल बोलत आहोत तो इंग्लंडचा नसून भारताचा डेव्हिड बेकहॅम आहे. हा फुटबॉल खेळाडू नसून सायकलपटू आहे. 2020 मध्ये बेकहॅमचे नाव पहिल्यांदा समोर आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारीला त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बेकहॅमचा उल्लेख केला होता.

19 वर्षांच्या बेकहॅमने 2020 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्समध्ये 17 वर्षांखालील स्प्रिंट सायकलिंगमध्ये 10.891 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलं होतं. यासोबतच त्याने 17 वर्षांखालील सांघिक स्प्रिंटमध्ये कांस्यपदकही पटकावलं. या कामगिरीसाठी चक्क पीएम मोदींनी बेकहॅमचं कौतुक केलं होतं.

कसं पडलं डेव्हिड बेकहॅम नाव
बेकहॅम निकोबारमधील पार्का गावात राहतो. इथं एका छोट्याशा तो आपला मामा आणि आजोबांसोबत राहतो. डेव्हिडचे मामा फुटबॉलपटू बेकहॅमचे मोठे चाहते आहेत.  2002 मध्ये फिफा वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना पाहत होते. या सामन्यात फुटबॉलपटू बेकहॅमने फ्री-किकवर गोल केला. या गोलच्या जोरावर इंग्लंडने सामना 1-0 ने जिंकला. यानंतर, मामाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

पुढच्याच वर्षी म्हणजे 2003 मध्ये सायकलपटू बेकहॅमचा जन्म झाला. मामाने आग्रह करत त्याचं नाव डेव्हिड बेकहॅम ठेवायला लावलं. 19 वर्षांचा बेकहॅम सांगतो, मला अनेक जण विचारतात की तू त्या बेकहॅमसारखा फूटबॉल का नाही खेळत. यावर त्याचं उत्तर असतं मला स्टार सायकलपटू डेव्हिड बेकहॅम म्हणून जगभरात स्वत:ची ओळख कमावयची आहे. सायकलस्वार असल्याचा मला अभिमान आहे.

डेव्हिडसमोर आव्हानांचा डोंगर
डेविड सायकलपटू डेबोराह हॅरॉल्ड आणि इसो अल्बेन यांना आपला आदर्श मानतो. या दोघांनी भारतासाठी अनेक मेडल जिंकली आहेत. बेकहॅमलाही भविष्यात त्यांच्याप्रमाणेच देशाचं नाव रोशन करायचं आहे. 

बेकहॅमला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण त्याने कधीही हार मानली नाही.  बेकहॅम एक वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा 2004 च्या त्सुनामीत मृत्यू झाला. यानंतर 2014 मध्ये त्याच्या आईचा घशाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. बेकहॅमची काळजी त्याच्या मामा आणि आजोबांनी घेतली. 

आज आई-वडिल जिवंत असते तर ते मला सायकलिंगमध्ये चॅम्पियन बनताना पाहू शकले असते असं बेकहॅम म्हणतो. बेकहॅमने खेलो इंडियामध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि आता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावं कमवायचं आहे. ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सायकलिंगमध्ये मेडल जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे.

मणिपूरचा रोनाल्डो सिंह
मणिपूरचा सायकलपटू रोनाल्डोची कहाणीही काहीशी डेव्हिड बेकहॅमसारखीच आहे. रोनाल्डोचे वडील रॉबेन सिंह सीआरपीएफ जवान होते. 2002 मध्ये इंफाळमध्ये रोनाल्डोचा जन्म झाला.

कसं पडलं रोनाल्डो नाव?
ब्राझील विरुद्ध इंग्लंड फूटबॉल सामन्यात 50 व्या मिनिटापर्यंत 1-1 अशी बरोबरी होती. त्यानंतर ब्राझीलला फ्री-किक मिळाली. रोबेन सिंह यांनी आपल्या मित्राबरोबर पैज लावली. या फ्री किकवर रोनाल्डिन्हो गोल मारेल. नेमकं झालंही तसंच. रोनाल्डिन्होने फ्री किकवर गोल करत ब्राझीलला 2-1 असा विजय मिळवून दिला. यानंतरच रोबेन सिंह यांनी आपल्या मुलाचं नावं रोनाल्डो ठेवलं.

आशिया कप ट्रॅक चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला
रोनाल्डोची उंची 6.1 फूट आहे आणि या उंचीचा त्याला सायकलिंगमध्ये खूप फायदा होतो. 2019 मध्ये  वयाच्या 17 व्या वर्षी  रोनाल्डोने जर्मनीतल्या फ्रँकफर्ट इथं झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सांघिक स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकलं आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनला. त्याने 200 मीटर टाइम ट्रायल स्प्रिंटच्या पात्रता फेरीत 10.065 सेकंदांच्या वेळेसह नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. 

यानंतर रोनाल्डोने 2022 आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये एकूण तीन मेडल जिंकली. रोनाल्डोने स्प्रिंट स्पर्धेत रौप्य पदक, एक किलोमीटर टाइम ट्रायल आणि सांघिक स्प्रिंटमध्ये प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकलं. एकाच स्पर्धेत तीन पदके जिंकणारा तो भारतातील पहिला सायकलपटू ठरला.

प्रत्येक विजय वडिलांना समर्पित 
रोनाल्डोच्या वडिलांचे 2017 मध्ये निधन झाले. तो आपल्या वडिलांना आपला आदर्श मानतो. रोनाल्डो म्हणतो की आयुष्यात जे काही शिकलो ते त्याच्या वडिलांकडून शिकलो. वडिलांनीच रोनाल्डोला अॅथलीट बनण्यास मदत केली. आता भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल मिळवून देण्याबरोबरच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे रोनाल्डोचं पुढील लक्ष्य आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *