“सीएम शिंदेंना धमकी देणारे कोण आहेत? हे…” विनायक राऊतांची अमित शाहांकडे चौकशीची मागणी | Shivsena MP vinayak raut reaction on CM eknath shinde threat to death rmm 97मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दसरा मेळाव्याच्या तोंडावरच मु्ख्यमंत्र्यांना अशाप्रकारे धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या घडामोडी सुरू असताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांना धमकीचे फोन आले असतील, तर याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची सर्वोच्च गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने एकनाथ शिंदे यांना धमकी दिल्याप्रकरणी चौकशी करावी. चौकशीतून समोर आलेल्या बाबी महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड कराव्यात, अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते” ऑन रेकॉर्डचा उल्लेख करत आशिष शेलारांचा दावा

एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणावर भाष्य करताना विनायक राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना जर धमकीचे फोन आले असतील, तर मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करतो की, त्यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी. तसेच उच्चस्तरीय चौकशीनंतर तपासात उघड झालेल्या बाबी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड कराव्यात. कारण मुख्यमंत्र्यांना धमकी देणारे नेमके कोण आहेत? हे महाराष्ट्रातील जनतेलाही कळालं पाहिजे” अशी प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली आहे.

हेही वाचा- CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री म्हणतात, “अशाप्रकारचं धाडस…”

विनायक राऊत पुढे म्हणाले की, हा कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रकार नसेल, याची मला खात्री आहे. परंतु दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचे धमकीचे फोन आल्याचं सांगून वातावरण निर्मिती करायची आणि सहानुभूती मिळवायची, असा प्रकार होत असेल, तर ती शंकाही दूर व्हायला पाहिजे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च गुप्तचर यंत्रणेकडून एकनाथ शिंदेंना आलेल्या धमकीच्या फोनबाबत चौकशी करावी आणि चौकशीतून समोर आलेल्या सत्य जनतेसमोर उघड करावं, अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे.Source link

Leave a Reply