cm eknath shinde in satara cabinet expansion portfolio distributionगेल्या महिन्याभरापासून राज्यात एकच चर्चा होती ती राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची. जवळपास महिनाभर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कारभार सांभाळल्यानंतर अखेर शिंदे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्याही ९ आमदारांचा समावेश आहे. यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती मंत्र्यांच्या खातेवाटपाची. अद्याप या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नसून त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपासंदर्भात भूमिका मांडली आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी आले. यावेळी त्यांनी टीव्ही ९ शी बोलताना समाधान वाटत असल्याचं सांगितलं. “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जन्मगावी आलोय. लोकांचं प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. समाधान वाटलं. माझी कर्मभूमी ठाणे-मुंबई आणि जन्मभूमी ही आहे. इथल्या भूमीपुत्रांनी मला बोलवलं म्हणून मी आलो. आपला माणूस मुख्यमंत्री झाला आहे अशी प्रत्येकाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसतेय. यापेक्षा दुसरं समाधान कुठलं नाही”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आहे”

राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार स्थापन झाल्याचं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. “माणूस कधी आपलं मूळ विसरत नाही. हे मूळ आहे. इथली सगळी माणसं जिवाभावाची आहेत. या भागासाठी विकासात्मक गोष्टी नक्कीच आम्ही करू. शिवसेना-भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्री संपूर्ण राज्याचा विकास करतीलच. त्याचबरोबर ही निसर्गसंपदा इथे आहे. पर्यटनाला खूप वाव आहे. त्याला चालना देण्याचं काम आम्ही करू”, असं देखील त्यांनी सांगितलं.

“मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”, पंकजा मुंडेंची मंत्रीपद न मिळण्यावर सूचक प्रतिक्रिया!

“मंत्रीमंडळ विस्ताराप्रमाणेच खातेवाटपही होईल”

दरम्यान, यावेळी सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या खातेवाटपाविषयीही एकनाथ शिंदेंनी माहिती दिली. “मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार असं विचारलं जात होतं, तो झाला. त्याप्रमाणे खातेवाटपही होईल. लवकरच सगळ्या गोष्टी होतील. त्या वेळेवरच होतील. पण आम्ही कुठेही विकासाची कामं थांबू दिलेली नाहीत. कालच आम्ही अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावर भरघोस अशी मदत दिली आहे. एनडीआरएफच्या नियमाच्याही दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. २ हेक्टरची मर्यादा होती, ती वाढवून आम्ही ३ हेक्टर केली आहे. असे अनेक निर्णय आम्ही महिन्याभराच्या काळात घेतले आहेत”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.Source link

Leave a Reply