cm eknath shinde busy in accepting felicitations says ajit pawar zws 70मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, स्वत:चे सत्कार करून घेण्यात ते सध्या दंग आहेत, असंवेदनशीलतेचे हे लक्षण आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्ला चढविला. राज्यातील विशेषत: विदर्भ व मराठवाडय़ातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायत शेतीसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये तातडीने मदत द्यावी अशी मागणी  त्यांनी केली.

पवार यांनी विदर्भ व मराठवाडय़ातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. विदर्भ, मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. त्यामुळे कृषी विभागाने व सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टीग्रस्त भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाहीत. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी होती, परंतु ती मिळालेली नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारला अद्याप कळवले नाही असे दिसते, त्यामुळे केंद्राचे पथक  पाहणी करायला आलेली नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. 

मुख्यमंत्री मिरवणुका, सत्कार, सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. रात्री दहा वाजल्यानंतर सभा घेता येत नाही,  तो एक नियम आहे. मात्र  राज्याचे प्रमुखच हा नियम तोडत आहेत, तर पोलीस अधीक्षक काय करणार, असा सवाल त्यांनी केला.

मंत्रिमंडळ विस्तार कुठे अडला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, विस्तार कशाुमळे अडला आहे, आमदारांची संख्या वाढली, त्यामुळे मंत्री कुणाला करायचे त्यावरून विस्तार थांबला आहे का, असा सवाल अजित पवार यांनी केला.

राज्यपालांना निवेदन

अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाडय़ातील शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले.Source link

Leave a Reply