Headlines

‘चला जाणुया नदीला’ अभियानाचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा

सोलापूर : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ‘चला जाणुया नदीला’ या अभियानाची दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक पार पडली. यामध्ये मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी हे अभियान कशा पध्दतीने राबविले गेले पाहिजे, यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आवश्यक आहे. कोणकोणत्या पध्दतीने हे अभियान यशस्वी होईल याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीमध्ये  देण्यात आलेल्या सूचनाबाबत काय कार्यवाही केली गेली आहे याचा आढावा पुढील बैठकीत घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह राणा देखील सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, राज्य शासनाचे हे अभियान खूपच महत्त्वाचे असून हे यशस्वी होणे गरजेचे आहे. या अभियानामध्ये 108 नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे अभियान राबविताना प्रथम नदी प्रदूषण कोणत्या कारणांमुळे होत आहे ते शोधून काढणे महत्त्वाचे आहे. नदी प्रदूषणाची कारणे मिळाल्यानंतर त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. याचबरोबर या अभियानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. या अभियानात सामाजिक कार्यकर्ते व  सामान्य नागरिक देखील सहभागी झाले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, या अभियानासाठी आपल्या जिल्ह्यात असलेल्या प्रत्येक नदीसाठी एक स्वतंत्र गट निर्माण केला पाहिजे. या गटामध्ये नदीची पूर्ण माहिती असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली जाईल. प्रदूषण व वन विभाग यांचा सक्रिय सहभाग या अभियानामध्ये आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील  महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांच्यामार्फत शहरातील, गावातील सर्व सांडपाणी ओढ्यामध्ये सोडले जाते. तेच पाणी नदीमध्ये जाते. हे टाळण्यासाठी सर्व विभागांचा देखील या अभियानामध्ये सहभाग घ्यावा लागेल. 13 डिसेंबर रोजी एक बैठक घेऊन या अभियानाचा कृती आराखडा तयार करण्यात येईल व 15 डिसेंबर पासून प्रत्यक्षात या अभियानाच्या कामाची सुरूवात करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अधिक्षक अभियंता, लाभ क्षेत्र विभाग धीरज साळे, उपवनसंरक्षक जी. एस. चोपडे, कृषि उप संचालक आर. टी. मोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागचे एस. बी. तोडकरी, उपविभागीय अभियंता उजनी कालवा विभाग क्र.8 ए. एच. गायकवाड, नेहरू युवा केंद्राचे अजित कुमार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *