challenge before praniti shinde to building congress organization in solapur zws 70एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता 

सोलापूर : राज्यात सत्तांतर नाटय़ घडण्याअगोदरपासून सोलापुरात काँग्रेस पक्षाची वाट बिकट होत आहे. सध्या तर आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघापुरताच काँग्रेस पक्ष मर्यादित राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या मागील निवडणुकीत गमावलेली सत्ता पुन्हा मिळविण्यापेक्षाही स्वत:ची ताकद वाढविण्याचे आव्हान पक्षासमोर उभे राहिले आहे. हे आव्हान पक्षापेक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाचे मानले जाते.

१९८५ सालचा पुलोदचा प्रयोग वगळता महापालिकेवर वर्षांनुवर्षे काँग्रेसची एकहाती सत्ता होती. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या गटात सत्तापदे वाटून घेतली जायची. त्यातून पवारांचे निकटवर्तीय युन्नूसभाई शेख आणि नंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या विश्वासातील विष्णुपंत कोठे यांच्यामार्फत महापालिकेच्या कारभाराची सूत्रे हलायची. नंतर त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तरी पुढे भागीदार म्हणून राष्ट्रवादीचा सत्तेत सहभाग राहिला होता. सुशीलकुमार शिंदे आणि विष्णुपत कोठे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर शहरात भाजपचे कमळ फुलू लागले, तसे काँग्रेसची ताकद घटायला सुरुवात झाली. आगामी महापालिका निवडणुका लढविण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीचे अस्तित्व कायम ठेवतील किंवा कसे, याचे चित्र अद्यापी स्पष्ट झाले नाही. राज्यात सत्तांतर नाटय़ घडल्यानंतर शिवसेनेची बदलती भूमिका पाहता पुन्हा महाविकास आघाडी होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोलापुरात जरी महाविकास आघाडी झाली तरी त्यातून एकमेकांच्या विरोधात संशय, अविश्वासाचे असलेले वातावरण संपुष्टात येण्याची शक्यता वाटत नाही, असा जाणकारांचा होरा आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे आता राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाहीत. सोलापुरात त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. परंतु मागील पाच वर्षांचा शहरातील काँग्रेसचा लेखाजोखा विचारात घेता आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षाची संघटना बांधणी करता आली नाही, तर उलट पक्षाची ताकद घटल्याचे दिसून येते. एक तर शहरात काँग्रेस पक्षावर प्रामुख्याने सुशीलकुमार शिंदे व आता आमदार प्रणिती शिंदे यांचाच प्रभाव राहात आला आहे. यात माजी खासदार धर्मणा सादूल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सत्यनारायण बोल्ली, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेते मंडळींचे फारसे काही स्थान उरले नाही. अ‍ॅड. बेरिया यांनी तर आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी थेट पंगा घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे पसंत केले आहे. दिवंगत स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांचे पुत्र महेश कोठे हे पूर्वी काँग्रेसनंतर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणाऱ्या संपर्कामुळे त्यांचे मन राष्ट्रवादीतही रमत नसल्याचे दिसते. म्हणजे महेश कोठे यांच्या राजकीय विश्वासार्हतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना त्यांचे पुढील राजकीय भवितव्य आगामी महापालिका निवडणुकीवर अवलंबून राहणार आहे.  आमदार प्रणिती शिंदे व महेश कोठे यांचीही मानसिकता पाहता हे दोघेही एकमेकांशी जुळवून घेण्याची शक्यता यापूर्वीच मावळल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीने आगामी महापालिका निवडणूक महेश कोठे यांच्यावर भिस्त ठेवून सत्ता संपादनाचे गणित घातले होते. हे गणित आता बिघडण्याचीच जास्त चिन्हे दिसतात. शिवसेनेचे तर दोन्ही काँग्रेसबरोबर सूर जुळणे अशक्य वाटते, अशी परिस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ताकद टिकवून ठेवण्याचा आणि त्यात वाढ करण्याचा प्रयत्न आमदार प्रणिती शिंदे करीत असल्या तरी त्यांच्या एकखांबी नेतृत्वाला हे सारे आव्हान कितपत झेपणार, याबद्दल सार्वत्रिक शंका-कुशंका व्यक्त होत आहे. त्यांच्यासमोर भाजपसह एमआयएम पक्षाचेही आव्हान आहे.Source link

Leave a Reply