केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा लवकरच अंत ; शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शननागपूर : केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून इतर राज्यांतील सत्ता घालवण्यासाठी दहशत निर्माण करणाऱ्यांना घाबरू नका. श्रीलंकेमध्ये सध्या काय सुरू आहे हे सगळे बघत आहेत. आजपर्यंत जगात जिथे जिथे हुकूमशाही आली, ती टिकली नाही. त्यामुळे चिंता करू नका, एकसंध राहा. सत्तेचा गैरवापर करणारे फार काळ टिकत नाहीत. केंद्रातील हुकूमशाही सरकारचाही शेवट होईल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शुक्रवारी नागपूर येथे एका कार्यक्रमाला आले असता ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. पवार म्हणाले, श्रीलंकेमध्ये एका कुटुंबाकडे सत्ता केंद्रित झाली होती. सत्तेचा वापर आम्हाला पाहिजे तसा आम्ही करणार, असा प्रकार सुरू होता. त्याचा परिणाम काय झाला हे आज संपूर्ण जग बघत आहे. तेथील तरुण मुले राष्ट्रपतींच्या घरात शिरून आंदोलन करीत आहेत. सत्तेचा गैरवापर जर कुणी करत असेल तर लोक त्याची हुकूमशाही उलथवून टाकतात. त्यामुळे आपण चिंता करण्याचे कारण नाही. एकसंध राहून पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.

हेही वाचा->> “शहाजहॉंने ताजमहलसाठी निविदा काढली नव्हती, मग मी सरकारी कामांसाठी का काढू”, गोव्यातील मंत्र्याचं विधान

विधानसभा निवडणुकीआधी पक्षातील अनेक नेते सोडून गेले. मात्र, जिद्द आणि चिकाटीने आपण पुन्हा पक्ष उभा करून पन्नासहून अधिक जागा जिंकल्या. अडीच वर्षे सत्तेत राहून लोकहिताची कामे केली. मात्र भाजपने केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून पहिल्या दिवसापासून राज्य सरकार अस्थिर करण्याचे काम केले. याची मोठी किंमत राष्ट्रवादी काँग्रेसला मोजावी लागली. अनिल देशमुखांवर सूडबुद्धीने कारवाई केली. नवाब मलिक हे नेहमी देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत होते. मी दिल्लीत असतानाही लोक नवाब मलिकांविषयी विचारत होते. मलिक यांच्या भाजपच्या धोरणांविरोधात बोलण्याचा वचपा काढण्यासाठी जुने कुठलेतरी प्रकरण काढत त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली. विरोधी आवाज बंद करण्याचा प्रकार केंद्रातील सत्तेकडून सुरू आहे. मध्य प्रदेशातही तेच झाले. आता महाराष्ट्रतही शिवसेनेच्या काही लोकांना हाताशी धरून येथील सत्ता पाडली, अशी टीका पवार यांनी केली.

नागपूरकर देशातील चित्र बदलू शकतात अधिकारांचा गैरवापर करून दहशत पसरवण्याचा प्रकार सुरू आहे. विशिष्ट विचारधारेच्या लोकांच्या हातात सत्ता केंद्रित झाल्याने विदर्भातही भाजपचे काहीसे वर्चस्व वाढले. मात्र नागपूर हे ऐतिहासिक आणि पुरोगामी विचारांचे शहर आहे. येथील जनता देशातील चित्र बदलू शकेल, असेही पवार म्हणाले.

Source link

Leave a Reply