Headlines

बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

[ad_1]

बुलडाणा, दि. 4 : बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा, लोणार, शेगाव अशी वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे असून लगतच्या जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ अशा पर्यटनस्थळांची जोड देऊन एक परिपूर्ण पर्यटन सर्कीट विकसित होऊ शकते. त्यामुळे या सर्व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दिले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज लोणार सरोवर आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्यासह लोणार परिसरातील विकास कामांशी संबंधीत विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले, वन कायद्याचे पालन करतानाच पर्यटनाचाही विकास होणे महत्त्वाचे आहे. लोणार येथे निसर्ग, अध्यात्म तसेच वैज्ञानिक दृष्टीकोनातून भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. लोणार सरोवरास दररोज दोन हजाराहून अधिक पर्यटक भेटी देतात. पर्यटकांची स्वच्छतेला पहिली पसंती असल्यामुळे त्यांच्यासाठी पुरेशी स्वच्छतागृहे असावीत यासाठीही प्रयत्न करावेत. लोणार सरोवर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. या सरोवराचा विकास हा इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने व्हावा. तसेच याठिकाणी वैविध्यपूर्ण दुर्मिळ वनस्पती असून त्यांचे जतन व संवर्धन करण्यात यावे. जिल्ह्यात लोणार, सिंदखेड राजा, शेगांव अशी वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे आहेत. तसेच जवळच वेरुळ, अजिंठा सारखी ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. या साऱ्यांच्या एकात्मिक पर्यटन विकासास मोठा वाव असल्याने त्यादृष्टीने व्यापक आणि सर्वसमावेशक प्रयत्न व्हावेत.

जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम सुरू आहे. खडकपुर्णा नदीवर हा प्रकल्प होत असून जिल्ह्याच्या सिंचन विकासासाठी हा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रकल्पात 2024 पर्यंत 40 टक्के पाणीसाठ्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती सादर करण्याच्या सूचना राज्यपालांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

लोणार सरोवराच्या प्रतिबंधित क्षेत्रामधून अडीच किलोमीटरच्या रस्त्याला मान्यता मिळाली आहे. या रस्त्यासाठी सर्व मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने कामे सुरू करावीत. तसेच दुर्गा टेकडीवरील मंजूरी मिळालेली कामेही पूर्णत्वास नेण्यात यावीत. याशिवाय लोणार परिसरातील विविध नागरी सुविधांच्या कामांचा आढावाही राज्यपालांनी घेतला.

सुरुवातीला पुरातत्व विभागातर्फे लोणार सरोवराविषयी माहितीपट सादर करण्यात आला. बैठकीनंतर लोणारच्या नगराध्यक्ष पुनम पाटोळे, पंचायत समिती सभापती वर्षा इंगळे, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डचे सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, मी लोणारकर संस्थेचे सचिन कापुरे यांच्यासह विविध संस्था आणि पदाधिकारी यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांची भेट घेतली.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचेकडून लोणार सरोवर परिसराची पाहणी

तत्पूर्वी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथील उल्कापातातून निर्मित जगप्रसिद्ध सरोवराची पाहणी केली.

त्यांचे समवेत जिल्हाधिकारी एस. राममूर्ती,आमदार श्वेता महाले तसेच वन विभाग, महसूल विभाग, पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

लोणार सरोवराच्या गणेश मंदिर प्रवेशद्वाराकडून प्रवेश करून सरोवराची पाहणी केली. त्यानंतर धारातीर्थ याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. उल्कापातातून तयार झालेल्या या अग्निजन्य खडकातील एकमेव सरोवराच्या जतन संवर्धनासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडून राबविल्या जात असलेल्या विकास आराखड्याबाबत त्यांना जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांनी माहिती दिली.

000000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *