राज्यातील शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थिर असून विधानसभेत आज जरी बहुमत सिध्द करण्याची वेळ आली तर संख्याबळ १६४ वरून १८४ झाल्याचे पाहण्यास मिळेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्र दौर्याच्या निमित्ताने बावनकुळे आज सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा- शिवसेना उद्धव ठाकरेंचा साताऱ्याचा सेनापती कोण? शिवसैनिकातून शेखर गोरे यांच्याकडे सूत्रे देण्याची मागणी
यावेळी ते म्हणाले, विरोधक राज्य सरकार कोसळणार असे किती जरी म्हणत असले तरी सरकार भक्कम असून उलट विधानसभेतील ताकद वाढल्याचेच पाहण्यास मिळेल. ज्यावेळी बहुमत सिध्द केले त्यावेळी १६४ आमदार सोबत होते, आता ही संख्या १८४ वर पोहचलेली पाहण्यास मिळेल. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केवळ काँग्रेसची घटनाच स्वीकारण्याचे उरले असून बाकी सर्व काँग्रेसचीच ध्येयधोरणे राबवली जात असल्याचा आरोप करत ते म्हणाले, गजानन कीर्तीकरांसारखे जेष्ठ नेते बाहेर पडून बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी होत आहेत. याचा ठाकरे यांनी विचार करायला हवा. संजय राउत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्यात अर्थ नाही. खासदार या नात्याने ते भेटू शकतात.
हेही वाचा- ‘भारत जोडो यात्रा काँग्रेस नेत्यांच्या मुलांना लॉंन्च करण्यासाठी’ बावनकुळेंच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “चिडखोर…”
राज्यात ५१ टक्के जागा मिळविण्याचे भाजपाचे लक्ष असून त्यादिशेने प्रयत्न सुरू आहेत. २०२४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसला उमेदवार शोधावे लागतील असेही त्यांनी सांगितले. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी व त्यांच्या पुत्रांनी हायजॅक केली असून सामान्य कार्यकर्ता मात्र बाजूलाच आहे. एकीकडे भारत जोडो यात्रा सुरू असताना काँंग्रेसचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. राष्ट्रवादी काँंग्रेस हा पक्ष सत्तेशिवाय राहूच शकत नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे या पक्षाचे धोरण असून यामुळे या पक्षात केवळ नेत्यांची गर्दी पाहण्यास मिळते. पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याठिकाणीच कायम राहतो. नेते मात्र मोठे होेत जातात. २०२४ पर्यंत या पक्षातून बाहेर पडणारांची यादी तयार करण्याची वेळ येईल असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा- “शरद पवारांनी जादूटोणा केला” म्हणणाऱ्या बावनकुळेंना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या “वडीलधाऱ्या व्यक्तीबाबत…”
दरम्यान, बावनकुळे यांच्या सहभागाने आज सांगलीत दुचाकी फेरी काढून भाजपाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या फेरीमध्ये कामगार तथा पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, आ. गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र महामंत्री मकरंद देशपांडे, पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, नीता केळकर, शेखर इनामदार जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष संग्राम देशमुख आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते या फेरीमध्ये सहभागी झाले होते.