Headlines

भाजपचा ओबीसी चेहरा

[ad_1]

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाचे ओबीसी नेते अशी ओळख आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उद्भवल्यावर बावनकुळेंनी संपूर्ण राज्यभर फिरून पक्षाची भूमिका मांडली होती. महाविकास आघाडीच्या काळात या मुद्दय़ावर आंदोलन करून सर्वाचे लक्ष वेधले होते. त्याचे बक्षीस त्यांना आता मिळाले. मितभाषी, पक्षातील सर्व प्रवाहांशी जुळवून घेणारे अशी त्यांची ओळख आहे. यामुळे उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपद हे दोन्ही महत्त्वाची पदे विदर्भातील नागपूर जिल्ह्याला मिळाली आहेत.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले ते विदर्भातील पाचवे अध्यक्ष  आहेत. यापूर्वी पांडुरंग फुंडकर, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी हे पद भूषवले. सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची  राजकीय कारकीर्द आहे. २००४ ते २०१४ या काळात सलग तीन वेळा ते कामठीचे आमदार होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना पक्षाने अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारली. ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता; पण पक्षश्रेष्ठींनी त्यांचा निर्णय बदलला नाही. खुद्द बावनकुळे यांनी त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत जाऊन आपले काय चुकले याची विचारणाही त्यांनी पक्षाकडे केली, पण तेथेही त्यांना उत्तर मिळाले नाही. मात्र यानंतरही ते पक्षासोबत एकनिष्ठ होते. बंडाची भाषा त्यांनी कधीही केली नाही. मात्र त्यांना तिकीट नाकारण्याचा फटका पक्षाला नागपूर व विदर्भात अनेक ठिकाणी निवडणुकीत बसला. हे लक्षात आल्यावर पक्षातून बावनकुळेंच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू झाले. वर्षभरापूर्वी त्यांना स्थानिक संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. ही संधी मिळताच त्यांच्या नेतृत्वात भाजपने ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटवला. त्यामुळे पक्षाचे ओबीसी नेते अशी त्यांची ओळख  तयार झाली. 

राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या दोघांचेही ते विश्वासू सहकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे नागपुरात पक्षाचे तिसरे सत्ताकेंद्र तयार झाले आहे. फडणवीस सरकारमध्ये ऊर्जामंत्री असताना कर्तबगार मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जात होता. सर्व पक्षांतील नेत्यांशी स्नेहाचे संबंध, कार्यकर्त्यांना उपलब्ध असणारा, सामान्यांच्या मदतीसाठी तत्पर असणारा व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारा नेता म्हणून कार्यकर्ते त्यांच्याकडे बघतात. राजकारणात असावी लागणारी आक्रमकता, विषयाची मुद्देसूद मांडणी,चोवीस तास काम करण्याची क्षमता व व्यवस्थापन कौशल्य बावनकुळे यांच्याकडे आहे. याचा उपयोग त्यांना आगामी लोकसभा व त्यापूर्वी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षबांधणीसाठी होईल. ग्रामीण भागातील सर्वसामान्य पार्श्वभूमी असणाऱ्या ओबीसी नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून भाजपने या समाजाला खूश करतानाच दुसरीकडे याच मुद्दय़ावर नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे यांना सूचक इशारा दिला आहे.

‘४५ खासदार निवडून आणणार’

आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या सर्व निवडणुका या भाजप आणि शिंदे गट एकत्र लढवेल, अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत केली. शिवाय आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजप आणि शिंदे गटाचे मिळून ४५ हून अधिक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *