शिवसेना गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. तसेच, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर उद्धव ठाकरे निराश झाल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा गट पाच नंबरला गेला आहे. भाजपाचे या निवडणुकीत २९४ सरपंच विजयी झाल्याने ठाकरे निराश झाले आहेत. त्यामुळे ते वारंवार माझ्या नावाचा उल्लेख करत आहेत. उद्याही निवडणूक झाली तर भाजपा महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष असेल,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
“अमित शाह यांच्याबाबत अशा विधानांची…”
अमित शाह यांना आस्मान दाखवण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे वाईट परिस्थितीमध्ये असून, बावचळल्यासारखी ते विधाने करत आहेत. अमित शाह यांच्याबाबत अशा विधानांची उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नव्हती. भाजपा उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईल.”
हेही वाचा – “काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती…”, गजानन किर्तीकरांनी दिला सल्ला; म्हणाले, “शिवसेनेने स्वतंत्र बाण्याने लढावे”
“उद्धव ठाकरे सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत”
“महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरेंनी व्यक्तिगत टीका केली. अडीच वर्षाच्या कार्यकाळात विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. अद्यापही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांनी उद्धव ठाकरे सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. हे राजकारण फार काळ टिकणार नाही, ते स्वत:ला संपवत आहेत. उद्धव ठाकरे घाबरलेल्या अवस्थेत बोलत आहेत,” असेही बानवकुळेंनी यांनी सांगितलं.