“भाजपा ब्रिटिशांप्रमाणे एका पक्षाला फोडून राज्य करत आहे”, नाना पटोलेंच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाले… | Chandrashekhar Bawankule comment on criticism by Nana Patoleकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा ब्रिटिशांप्रमाणे पक्षांमध्ये फूट पाडून राज्य करत आहे, अशी टीका केली. यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “विरोधक सत्ता गेल्यामुळे असे आरोप करत आहेत,” असा आरोप बावनकुळेंनी केला. तसेच धानाचा बोनस मविआ सरकारने बंद केला होता. यावर नाना पटोलेंकडे काय उत्तर आहे? असा सवाल केला. ते मंगळवारी (१३ सप्टेंबर) नंदुरबार येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “विरोधक सत्ता गेल्यामुळे असे आरोप करत आहेत. भाजपा आणि सत्तेतील लोकांवर टीका करायची आणि दिवसभरात माध्यमांमध्ये काहीतरी वाद करायचा म्हणून ही टीका होत आहे. त्यांच्या सरकारच्या काळात नाना पटोलेंच्या समोर त्यांच्या जिल्ह्यात सरकारने धानाचा बोनस बंद केला होता. फडणवीस सरकार शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देत होतं.”

“धानाचा बोनस मविआ सरकारने बंद केला”

“आज ते शेतकरी यांना गावात येऊ देत नाहीत. कारण धानाचा बोनस मविआ सरकारने बंद केला होता. यावर नाना पटोलेंकडे काय उत्तर आहे? सत्ताधारी पक्षाने जनतेच्या मागण्यांचा पाठपुरावा करत सरकारकडून त्या मान्य करून घेतल्या पाहिजेत. तसेच त्या योजना लोकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत,” असं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

“सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षात जातो तेव्हा तो बावचळतो”

पितृपक्षामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कार्यभार स्विकारला नाही या अजित पवारांच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सर्व मंत्र्यांनी आपआपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. मी स्वतः पाहिलं आहे की सर्व मंत्री कामाला लागले आहेत. सत्ताधारी पक्ष जेव्हा विरोधी पक्षात जातो तेव्हा तो बावचळलेला असतो. त्यांना आपण सत्तेतून गेलोय हे लक्षातच येत नाही. त्यांनी आधी सांगावं की पहिले १८ महिने तुमचा मुख्यमंत्री मंत्रालयात का आला नाही? त्यांना हे विचारण्याचा अधिकार आहे का? त्यांनी आधी स्वतःच्या चुका पाहाव्यात.”

“मविआ काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी १८ महिने फक्त फेसबूक लाईव्ह केलं”

“राज्याचा मुख्यमंत्री १८ महिने फेसबूक लाईव्ह करतो, १८ महिने मंत्रालयात येत नाही. पालकमंत्री म्हणून ज्यांची निवड केली ते जिल्ह्याचे पालकमंत्री न राहता केवळ आपल्या मतदारसंघाचे पालकमंत्री होतात. त्यांना आमच्या सरकारला हे विचारण्याचा अधिकार नाही. त्यांचं सरकार असताना १८ महिने मंत्रालयात गेले नव्हते हे ते विसरले का? त्यांचे पालकमंत्री झेंडा ते झेंडा होते. ते जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ झेंडावंदनाला यायचे. त्यांनी कधीही आपला जिल्हा म्हणून कामच केलं नाही. त्यांनी आपल्या मतदारसंघापुरतंच काम केलं,” असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

“लोकं मरत असताना त्यांनी १८ महिने महाराष्ट्राचं दर्शन घेतलं नाही”

बावनकुळे पुढे म्हणाले, “ज्यांनी फार चांगलं काम केलं त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, करोना संसर्गाच्या काळात लोकं मरत असताना त्यांनी १८ महिने महाराष्ट्राचं दर्शन घेतलं नाही. या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आयसीयूत जात होते, धुळे, नंदूरबारमध्ये फिरत होते. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री १८ महिने गायब होते.”

हेही वाचा : जग कुठे चालले आहे अन् यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला ; अजित पवार यांची सरकारवर टीका

“विरोधकांच्या ९० टक्के टीका माध्यमांमध्ये बातम्या करण्यासाठी”

“त्यामुळे त्यांना हे विचारण्याचा अधिकारच नाही. विरोधकांच्या ९० टक्के टीका माध्यमांमध्ये बातम्या करण्यासाठी आहेत. त्यांच्या टीकेवर आम्हाला फार लक्ष देण्याची गरज नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.Source link

Leave a Reply