bjp ashish shelar mocks shivsena uddhav thackeray vedanta foxconn project


गेल्या तीन महिन्यांपासून शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा राजकीय सामना पाहायला मिळत असला, तरी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वितुष्ट आता अधिकच वाढले आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं चित्र आत्तापासूनच पाहायला मिळत आहे. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या अनुषंगाने राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये या प्रकल्पापासून ते कसाब आणि याकूब मेमनच्या कबरीपर्यंत अनेक मुद्दयांवरून शिवसेनेला लक्ष्य करण्यात आलं आहे.

“पेंग्विन सेनेची अवस्था…”

शिंदे गटाच्या बंडखोरीवरून आशिष शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेससोबत सलगी आणि शिवसेनेला संपवून स्वतः वाढणाऱ्या राष्ट्रवादीसोबत अती प्रेमाचे उमाळे यामुळे स्वपक्षातील लढवय्ये मोहरे पक्ष सोडून गेले. महाराष्ट्र हातून गेला. आता मुंबईकरांच्या हातून मुंबई काढून घेणार याची चाहूल लागली. त्यामुळे तेलही गेले आणि तुपही गेले हाती धुपाटणे फक्त शिल्लक राहण्याची वेळ आली, अशी अवस्था पेग्विन सेनेची झाली आहे”, असं या पत्रात म्हटलं आहे.

“आयना का बायना…घेतल्याशिवाय जायना! असे वागणाऱ्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत. मागणारच! २५ वर्षांत २१ हजार कोटी खर्च करून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे कसे? द्या हिशेब. ४५ हजार कोटींचा अर्थसंकल्प कुठे खर्च होतो? द्या हिशेब. फॉक्सकॉन आणि वेदान्तकडून किती मागितले? १०% कि त्यापेक्षा जास्त?”, असे प्रश्न आशिष शेलार यांनी शिवसेनेला केले आहेत.

ashish shelar letter to shivsena uddhav thackeray
आशिष शेलार यांचं उद्धव ठाकरेंना खुलं पत्र!

“मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढवू”

दरम्यान, मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल, असं आशिष शेलार या पत्रात म्हणाले आहेत. “होय, आम्ही मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढवू. त्यासाठी प्रयत्न करु. पालिकेच्या मराठी शाळांची टक्केवारी वाढवू. तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा मराठी माणसासाठी किती ‘टक्के’ काम केलेत त्याचा हिशेब द्या”, असं शेलार यांनी नमूद केलं आहे.

“तुम्ही तिघांनी मिळून अडीच वर्षं मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण..”, देवेंद्र फडणवीसांचं खळबळजनक विधान!

“कसाब काय खंजीर देऊन गेलाय का?”

“हसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे,भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा! कसाब तुम्हाला खंजीर देऊन गेलाय की काय? भाजपाचा राजकीय कोथळा काढायला? ही औरंगजेबी भाषा आपल्या तोंडी शोभते का?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

धनुष्यबाण चिन्हावरून टोला

दरम्यान, पत्रामधून आशिष शेलार यांनी धनुष्यबाण चिन्हावरूनही टोला लगावला आहे. “स्वतः मुख्यमंत्री होतात तेव्हा लगेचच निवडणुका का घेतल्या नाहीत? आणि आज आम्हाला काय सांगताय लगेच निवडणूक घ्या? आम्ही तयार आहोत. तुमच्याकडे तुमचा धनुष्यबाण तरी हातात आहे का?” असा खोचक सवाल शेलार यांनी शिवसेनेला केला आहे. “क्रॉफर्ट मार्केट ते देवनार या सगळ्याचा बरेच ‘टक्के’ हिशेब बाकी आहे. योग्य वेळी करुच!” असंही ते पत्राच्या शेवटी म्हणाले आहेत.Source link

Leave a Reply