भाईंदरच्या सोने व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खूनरत्नागिरी :  भाईंदर येथील सोने व्यावसायिक कीर्तीकुमार अजय राज कोठारी (वय ५५ वर्षे) यांची येथील सोनार भूषण खेडेकर याने आर्थिक कारणातून आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने दोरीने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्याच्यासह महेश मंगलप्रसाद चौगुले (वय ३९ वर्षे, रा.मांडवी, रिक्षाचालक) आणि फरीद मेहमूद होडेकर (वय ३६, रा. भाटय़े , खोतवाडी) या आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही संशयित आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा खून केल्यानंतर मध्यरात्री कीर्तीकुमार कोठारी यांचा मृतदेह आबलोलीजवळ नदीत फेकल्याची कबुली भूषणने पोलिसांना दिली आहे.  तसेच मृतदेह घेऊन जाण्यासाठी वापरलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.

 भाईंदर येथील सोने व्यावसायिक कोठारी यांचा सोने-चांदीच्या दागिन्यांचा व्यापार असून गेली काही वर्षे ते रत्नागिरीत नियमितपणे येऊन येथील सोनारांना सोने विक्री करत होते. गेल्या रविवारी (१८ सप्टेंबर) ते येथील आठवडा बाजार परिसरातील एका लॉजमध्ये उतरले होते. सोमवारी दिवसभरात बाजारपेठेत व्यवहार केल्यानंतर रात्री ते गोखले नाक्याकडून रामआळीकडे जात असताना कोणाचा तरी फोन आल्याने पुन्हा मागे फिरून गोखले नाका येथून आगाशे कन्याशाळेजवळ चालत गेल्याचे सीसी टीव्ही फूटेजमध्ये दिसून आले. तेथून मात्र ते बेपत्ता झाले होते.  दरम्यान, त्यांचा मुलगा करण कोठारी याने वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. म्हणून त्याने नातेवाईकांसह रत्नागिरीत येऊन वडील  उतरलेल्या लॉजमध्ये आणि त्यांच्या संपर्कातील सराफांकडून माहिती घेऊन व चौकशी करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी कीर्तीकुमार यांचा तपास करताना बाजारपेठ परिसरातील सीसी टीव्ही फूटेज पाहिले असता त्यांना सोमवारी रात्री ८.२४ च्या  सुमारास कीर्तीकुमार आगाशे कन्या शाळेसमोरच्या त्रिमूर्ती ज्वेलर्स या दुकानात जाताना दिसून आले. परंतु ते दुकानातून पुन्हा बाहेर येताना दिसले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दुकानमालक भूषण खेडेकरसह (वय ४२ वर्षे, या. खालची आळी, )या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या अन्य दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच भूषणने महेश आणि फरीद या दोघांच्या मदतीने आपण कीर्तीकुमार कोठारी यांना आधी हातांनी आणि नंतर दोरीने गळा दाबून ठार मारल्याचे कबूल केले. 

खून केल्यानंतर संशयितांनी कीर्तीकुमार यांचा मृतदेह गोणत्यात भरून दुकानातच ठेवला आणि तिघेहीजण घरी गेले. भूषणने घरी जाऊन जेवण केले. त्यानंतर तो आईसक्रीम आणण्यासाठी बाहेर जाऊन पुन्हा घरी परतला होता. ठरलेल्या योजनेनुसार मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह असलेली गोणी रिक्षामध्ये ठेवून तिघेहीजण मजगाव रोडने करबुडे, राईभातगावमार्गे आबलोली येथे गेले. तेथील नदीच्या पुलाखाली मृतदेह गोणीत भरलेल्या अवस्थेत टाकून दिला. त्यानंतर पहाटे तिघेही रत्नागिरीत परतले.  आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असला तरी त्याचे स्वरूप काय आहे, तसेच कीर्तीकुमार रत्नागिरीत आले तेव्हा त्यांच्याकडे असलेले सुमारे १० लाख रुपयांचे दागिने भूषणनेच लुबाडले आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक विनित चौधरी पुढील तपास करत आहेत.

Source link

Leave a Reply